मुंबई,
Prem Chopra health update, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि खलनायकी भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे प्रेम चोप्रा यांची प्रकृती आता सुधारत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना गंभीर आर्टिक स्टेनोसिस असल्याचे निदान झाले.
प्रेम चोप्रा यांचे जावई आणि अभिनेते शर्मन जोशी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकृतीविषयीची माहिती दिली. त्यांनी रुग्णालयातील काही छायाचित्रे शेअर करत डॉक्टरांचे आभार मानले. या छायाचित्रांपैकी एका फोटोमध्ये ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र हे देखील दिसून येत असून त्यांनीही रुग्णालयात जाऊन प्रेम चोप्रा यांची भेट घेतली होती.
शर्मन जोशीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. रविंदर सिंह राव यांनी प्रेम चोप्रा यांच्यावर उपचार केले. त्यांना आर्टिक वॉल्व स्टेनोसिसच्या गंभीर स्वरूपाचे निदान झाल्यानंतर डॉ. राव यांनी ओपन-हार्ट सर्जरी न करता TAVI प्रक्रिया (Transcatheter Aortic Valve Implantation) यशस्वीरीत्या पार पाडली. डॉ. गोखले यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण उपचारप्रक्रियेबाबत कुटुंबाला आत्मविश्वास मिळत राहिला, असे शर्मनने लिहिले. प्रक्रियेदरम्यान कोणत्याही गुंतागुंतीचा सामना करावा लागला नाही आणि आता प्रेम चोप्रा घरी परतले असून त्यांची तब्येत सुधारत आहे, असेही त्यांनी नमूद केले.चोप्रा हे 90 वर्षांचे असून वयोमानानुसार त्यांना काही इतर आरोग्य समस्या आहेत. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले असून तब्बल 380 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र आता त्यांची सुधारलेली तब्येत पाहून चोप्रा कुटुंबाने चाहत्यांनी व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.