मुंबई,
Raj Thackeray court summons मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर झालेल्या ठाण्यातील उत्तर सभेत रत्नजडीत तलवार उंचावल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत आले आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी येत्या गुरुवारी, 11 डिसेंबर रोजी त्यांना ठाणे न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह सात ते आठ जण आरोपी म्हणून नामनिर्देशित आहेत.
गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे आणि मदरशांवर कारवाईची भूमिका मांडल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या वक्तव्याचे पडसाद उमटत असतानाच राज ठाकरे यांनी 12 एप्रिल 2022 रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन जवळील डॉ. मूस रस्त्यावरील चौकात उत्तर सभा घेतली होती. त्या सभेत महाआघाडीतील अनेक नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांनी आक्रमक भूमिका मांडली होती.
या सभेदरम्यान ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना रत्नजडीत तलवार भेट दिली. त्यांनी ही तलवार म्यानातून काढून व्यासपीठावर उंचावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधान कलम 34 तथा भारतीय हत्यार कायदा 1959 मधील कलम 4 आणि 25 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याची सुनावणी ठाणे न्यायालयात ठेवण्यात आली असून, त्यामुळे गुरुवारी राज ठाकरे हजर राहणार आहेत.