स्मरण समर गीताचे

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
अग्रलेख
 
vande mataram  8 डिसेंबर 2025 दिवस हा सनातन हिंदुस्थान आणि मातृभूमीला सर्वोतोपरी मानणाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा आणि अंगावर रोमांच आणणारा होता. देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे झाली आहेत. जो कधी साजरा करण्यात आला नाही, असा उत्सव भारतीय जनमानसाचे प्रतिबिंब असलेल्या पवित्र संसदेत साजरा झाला. निमित्त होते वंदे मातरम् या गीताला 150 वर्षे झाल्याचे. 1875 मध्ये कवी बकिमचंद्र चटर्जी यांनी एका उन्मनी अवस्थेत वंदे मातरम् हे गीत लिहिले. या गीतात एकूण पाच कडवी आहेत. त्यातील
 
वंदे मातरम् वंदे मातरम्
सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम
शस्य शामलाम मातरम्, वंदे मातरम्
शुभ्र ज्योत्सा, पुलकित यामिनी, फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी
सुहासिनी, सुमधूर भाषिणी, सुखदां वरदां मातरम्
वंदे मातरम्, वंदे मातरम्
 
 

वंदे मातरम  
 
हे कडवे स्वतंत्र, प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून 1950 साली संसदेत घोषित करण्यात आले. जन गन मन, या राष्ट्रगीताचा समान दर्जा वंदे मातरम् गीताला देण्यात आला. स्वातंत्र्य लढ्याच्या समरात हे गीत गात अनेक ज्ञात-अज्ञात देशभक्तांनी
प्राणाचे बलिदान दिले. इंग्रजांचा विरोध आणि बंदी असतानाही देशभरात प्रभात फेऱ्यांमधून हे गीत गायीले जात असे. या गीताच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा भाव जागृत करण्याचे काम करण्यात आले. वंदे मातरम् चा अर्थ फार सोपा आणि सर्वांना
समजणारा आहे. भारतभूची महती या गीतातून सांगण्यात आली.
ख्यातनाम संगीतकार ए.आर रहमान यांनी वंदे मातरम् या अल्बमच्या माध्यमातून वंदे मातरम् ....मा तुझे सलाम हे गीत गायीले जे आजही राष्ट्रभक्तांच्या ओठी आहे. ए.आर. रहमान यांनी वंदे मातरमचा अर्थ अगदी सोप्या शब्दात सांगितला. 1997 मध्ये स्वातंत्र्य मिळून 50 वर्षे झाल्याच्या निमित्त पं भीमसेन जोशी यांनी तबला पेटी घेऊन संसदेत वंदे मातरम् हे गीत गायिले होते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जवळपास 50 वर्षे या गीताने भारतीयांच्या मनावर राज्य केले.vande mataram धर्मभेद न बाळगता अनेक क्रांतीवीर फासावर गेले. गेल्या शंभर वर्षांत रविंद्रनाथ टागोर ते ए.आर. रहमान यांच्यापर्यंत अनेक संगीतकार, गीतकारांनी या गीताला चाली दिल्या आहेत. 1951-52 नंतर केवळ औपचारिकता म्हणून शासकीय पातळीवर या गीताची दखल घेण्यात आली. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धाच्या काळात हे गीत वाजविले गेले. याशिवाय खानापूर्ती म्हणून दरवर्षी येणारा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला या गीताचे स्वर कानी पडतात. अन्यथा सरकारने जणू या समर गीताची उपेक्षाच केली, असे म्हणावे लागेल. पुढे तर या गीताला धर्माशी जोडले गेले. वास्तविक पाहता हे गीत मातृभूमीचे गुणगान करणारे आहे. या भूमीचे गुणगाण करण्यात कुणालाही हरकत नसायला हवी. पण, दुर्देवाने स्वातंत्र्यानंतर देशात धर्माच्या आधारावर असे काही वातावरण तयार करण्यात आले की, वंदे मातरम् हे जणू एखाद्या देवदेवतेची स्तुती अथवा वंदन करणारे गीत आहे. या भावनेला सरकारनेही खतपाणी देण्याचे काम केले. वास्तविक पाहता या भारतभूला मातेच्या रुपात कल्पित केले आहे एवढेच. दुर्देवाने काही धर्मांध मातेचा हा भाव ओळखू शकले नाहीत अथवा देशापेक्षा धर्माला महत्व दिले जात आहे. एवढी वर्षे उदासीनतेमुळे म्हणा की मरगळ आल्यामुळे म्हणा, बहुसंख्य समाजानेही याकडे दुर्लक्ष केले. पण, परिस्थितीत बदल होतच असतो. 2014 पासून बहुसंख्यकांसाठी सरकारच्या पातळीवर अनुकूल बदल होण्यास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने असे काही निर्णय घेतले आहेत की ज्यामुळे बहुसंख्य समाजात आत्मविश्वास निर्माण होऊन ते आपल्या भावना सार्वजनिकपणे प्रगट करू लागले. वंदे मातरम् गीतावर संसदेत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय हा त्यापैकी एक. या गीताची महती ओळखून त्याचे स्मरण करण्यासाठी आणि नव्या-जुन्या पिढीला त्याचे महत्व सांगण्यासाठी संसदेत या राष्ट्रगीतावर चर्चेचे आयोजन करण्यात आले. 8 डिसेंबरला बरोबर बाराच्या ठोक्याला लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेला सुरूवात केली. राष्ट्रवादावर मोदींचे भाषण म्हणजे एकणाèयांचे मन आणि कान तृप्त झाल्याशिवाय राहत नाही. वंदे मातरम् चा इतिहास सांगताना त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांचे अक्षरशः वाभाडेच काढले. या गीताला विरोध करता करता देशाच्या विभाजनाची बीजे कशी रोवल्या गेली, हे सांगताना त्यांनी गीताचे तुकडे करण्याबरोबच देशाचे तुकडे होण्यास तत्कालीन काँग्रेस आणि या पक्षाचे नेते कसे कारणीभूत होते हे सांगितले. मोदींचे भाषण सुरू असताना काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमूक, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांनी गदारोळ करणे सुरु ठेवले. पण, मोदींच्या कोणत्याही मुद्यांचे त्यांच्याकडे उत्तर नव्हते. कारण,
मतांसाठी ते अल्पसंख्यक आणि हिंदूविरोधी मतांवर अवलंबून ते खुल्या मनाने वंदे मातरमचे समर्थनही करू शकत नव्हते. वंदे मातरम ऐवजी ते सरकार कसे चुकीचे करीत आहे यावर बोलून वेळकाढूपणा करीत होते. एरवी अघळपगळ बोलून पक्षाला अडचणीत आणण्यात हातखंडा असलेले राहुल गांधी तर सभागृहातच नव्हते. लोकसभेतील विरोधी पक्षनेता सभागृहात नसणे याचा अर्थ काँग्रेसचा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच आताचे राहुल गांधी यांचाही वंदे मातरम्ला विरोध असल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसकडून प्रियांका वढेरा यांनी भाषण केले पण त्यांनी तर कहरच केला. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने संसदेत चर्चा घडवून आणली असल्याचे सांगत आता वंदे मातरमवर चर्चा करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला. यावरून काँग्रेस तुष्टीकरणासाठी कोणत्या थराला जावू शकते, हे दिसून आले. पुढील वर्षी बंगामध्ये निवडणुका येणे आणि वंदे मातरमला दीडशे वर्षे पूर्ण होणे याचा काहीच संबंध नाही.vande mataram कारण, या गीताला दीडशे वर्षे पूर्ण होणे हा काही योगायोग नाही. गीताला 50 वर्षे झाली तेव्हा देश पारतंत्र्यात होता तर शंभर वर्षे झाली तेव्हा देशात आणीबाणी सुरू होती. लोकशाहीचा गळा घोटण्यात आला होता. आता दशकभरापासून केंद्रात राष्ट्रवादी सरकार सत्तेत असल्याने आज या गीताचे महत्त्व युवापिढींना समजावून सांगितले जात आहे. आपल्या ऐतिहासिक वारशाची हेटाळणी करण्याचे काम काँग्रेस करीत आली आहे. मोदी सरकारने राष्ट्रगीतावर संसदेत चर्चा घडवून आणत येणाऱ्या पिढ्यांना वंदे मातरम्चे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दुर्दैवाने विरोधक याचेही राजकारण करीत आहेत.
बकिमचंद्र चटर्जी यांचे पाचव्या पिढीतील वंशज सजल चटर्जी हे कोलकाता येथील शोभा बाजारात राहतात. स्वातंत्र्यानंतर बकिम बाबूंची बहुतांश मालमत्ता वारसा म्हणून घोषित करण्यात आली. कोलकाता येथील बकिमचंद्र बाबू यांच्या घराचे ग्रंथालयात रुपांतर करण्यात आले. मात्र, त्या घराची आता दुरवस्था झाली असून या ग्रंथालयाच्या आसपास कचरा साचला आहे. हे दृश्य मनाला वेदना देणारे आहे. आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात असताना बकिम बाबूंच्या वंशजांना कुणी विचारायला तयार नाहीत, आम्ही कसे आहोत याची चौकशीही बंगाल सरकार करीत नाही, अशी खंत सजल चटर्जी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर बंगालमध्ये 1977 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर पुढील 35 वर्षे हा प्रांत डाव्यांच्या हातात होता. 2011 पासून काँग्रेसपासून फुटून वेगळ्या झालेल्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. डाव्यांचा तर वंदे मातरम्ला विरोध आहेच पण त्यापूर्वी काँग्रेस सरकारनेही वंदे मातरम् गीताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सुदैवाने देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक राष्ट्रवादी विचारांचे पंतप्रधान लाभल्याने वंदे मातरम्चे स्मरण करण्याचे सौभाग्य सर्वांना लाभले आहे.