गडचिरोली,
Rina Bhaskar शहरातील चंद्रपूर मार्गावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. बी फॅशन प्लाझा समोर मालवाहू ट्रक रिव्हर्स घेत असताना त्यांच्या दुचाकीचा तोल सुटून त्याखाली कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत व प्रचंड रक्तस्राव झाला. दरम्यान, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ममता बांबोळे असे त्या मृतक महिलेचे नाव असून त्या कार्मेल स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. त्या मूळच्या पोर्ला येथील असून त्या कॉम्प्लेक्स येथे आपल्या आईकडे राहत होत्या, अशी माहिती आहे. या मुख्य मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यातच मार्गालगत असलेल्या अनेक दुकानांनी रस्ताच गिळंकृत केल्याचे चित्र असून, दुकानासमोर पार्किंग नसल्याने वाहनधारक थेट रस्त्यातच वाहने उभी करतात. काही दुकानांचे सामानही थेट रस्त्यावर ठेवले जाते. परिणामी मार्ग अरुंद होऊन वाहतूक कोंडी तर होतेच, मात्र मोठ्या वाहनांना वळसा घेणे कठीण बनले असून अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. आजचा अपघातही अशाच परिस्थितीत घडला असल्याने अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मालवाहू ट्रक रिव्हर्स घेत असताना जागा कमी असल्याने दुचाकीवरून जाणार्या बांबोळे यांना तो अचानक दिसला आणि त्यांनी दुचाकीचे ब्रेक दाबताच वाहन स्लिप झाले. त्या रस्त्यावर कोसळताच गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली तसेच काही काळ वाहतूकीचा खोळंबा निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था नसणे आणि वाहतूक नियंत्रण न होणे याबाबत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. संबंधित ट्रक चालकास अटक करण्यात आली असून पोलिस तपास सुरु आहे. दरम्यान, पोलिस व स्थानिक प्रशासनाकडून वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे पालन व मुख्य मार्गावरील अतिक्रमणावर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.