तिरुपतीत लाडूनंतर रेशमी दुपट्ट्यांचा घोटाळा!

रेशमी दुपट्ट्यांऐवजी स्वस्त पॉलिस्टरचा वापर

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
तिरुमला,
Silk dupattas scam in Tirupati आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानममध्ये लाडू घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच, आता मंदिरात आणखी एक मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाविकांना रेशीम म्हणून वाटण्यात येणारे दुपट्टे प्रत्यक्षात १००% पॉलिस्टरचे असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तिरुमला मंदिराला भेट देताना देणगीदार, व्हीआयपी दर्शन घेणारे भक्त आणि विशेष समारंभातील पाहुण्यांना दिली जाणारी ही वस्त्रे पूर्णपणे रेशमाची असावीत, असा नियम आहे. मात्र, ते पाळले गेले नसल्याचे धक्कादायक वास्तव तपासातून स्पष्ट झाले.
 
 

Silk dupattas scam in Tirupati 
२०१५ ते २०२५ या कालावधीत एका खासगी कंपनीने मंदिराला पुरवलेले दुपट्टे शुद्ध मलबेरी सिल्क असल्याचे दाखवले, परंतु प्रत्यक्षात ते सर्व स्वस्त पॉलिस्टरचे असल्याचे उघड झाले. या फसवणुकीची रक्कम तब्बल ५५ कोटी रुपयांवर गेल्याचे ट्रस्टने सांगितले. नियमांनुसार प्रत्येक दुपट्टा रेशीमाचा असावा, त्यावर रेशमी होलोग्राम असावा, तसेच त्याच्या ताना–विणकामासाठी २०/२२ डेनियर धाग्याचा वापर बंधनकारक आहे. शिवाय, दुपट्ट्यावर संस्कृत आणि तेलुगू भाषेत “ओम नमो वेंकटेशाय” ही अक्षरे आणि विशिष्ट धार्मिक चिन्हे असणे आवश्यक आहे.
 
 
या सर्व निकषांचा भंग झाल्याच्या संशयावरून टीटीडीने गोदामातून तसेच मंदिर परिसरातून नमुने घेतले आणि ते बेंगळुरू व धर्मावरम येथील केंद्रीय रेशीम मंडळाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. दोन्ही अहवालांनी दुपट्टे पूर्णपणे पॉलिस्टरचे असल्याची पुष्टी केली. यानंतर ट्रस्टने हे प्रकरण आंध्र प्रदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवले आहे. फसवणुकीत कोणाचा सहभाग आहे आणि या घोटाळ्याची मुळं किती खोलवर गेली आहेत, याचा तपास आता एसीबी करणार आहे. दरम्यान, नागरी येथील दुपट्टे पुरवणाऱ्या व्हीआरएस एक्स्पोर्ट्स या कंपनीला अलीकडेच आणखी १५ हजार दुपट्ट्यांचा करार देण्यात आला होता. तपासानंतर हा करार तात्काळ रद्द करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. तिरुमला मंदिरातील रंगनायकुला मंडपम येथे होणाऱ्या वेदशिर्वचनम समारंभात तसेच व्हीआयपी दर्शनाच्या वेळी भक्तांना दिले जाणारे हे दुपट्टे अत्यंत पवित्र मानले जातात. त्यामुळे गेल्या दशकभर भाविकांच्या श्रद्धेशी खेळ झाल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे.