माळशिरस,
Skulls near a burning pyre माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरातील स्मशानभूमीत मध्यरात्री घडणाऱ्या संशयास्पद आणि आघोरी प्रकारांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैकुंठ स्मशानभूमीत जळत्या चितेजवळ काळ्या बाहुल्या, लिंबू, सुया, नारळ, दारूच्या बाटल्या, काही व्यक्तींचे फोटो, तसेच कोंबड्या आणि कवट्या यांसारख्या वस्तू ठेवलेल्या अवस्थेत सापडल्या. गावकऱ्यांच्या मते, चितेमधील काही अवशेषही अदृश्य झाल्याचे दिसून आले असून यामुळे अधिकच दहशत निर्माण झाली आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री अशा वस्तू आढळण्याचे प्रमाण वाढते, मात्र गेल्या काही दिवसांत या घटना सातत्याने घडत असल्याने जादूटोणा किंवा आघोरी कृत्य केले जात असल्याचा संशय बळावला आहे. या सर्व घडामोडींची माहिती पसरताच नातेपुते गावात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या प्रकरणाचा गंभीरपणे विचार करून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. समाजात भीती निर्माण करणारे आघोरी किंवा अंधश्रद्धेवर आधारित कृत्य करणाऱ्यांविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. स्मशानभूमीत या वस्तू ठेवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू असून परिसर भयमुक्त करण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडमध्ये काम करत आहेत.

