मत्स्यपुराण

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
धर्म-संस्कृती  
 
matsyapurana अठरा पुराणांतील भगवान विष्णूंचा प्रथम अवतार ज्या पुराणात वर्णन केलेला आहे त्या पुराणाला मत्स्यपुराण म्हणतात. वास्तविकत: मत्स्य म्हणजे मासा. माशाचे जीवन पाण्यात मर्यादित असते. मासा सामान्य अर्थानी कमजोर प्राणी आहे. पण तरीही भगवान विष्णूंनी आद्यावतार म्हणून मत्स्यावतार धारण केला. हाच अवतार सजीव सृष्टीच्या बीजरक्षणाचेही कारण ठरला. या अवताराचेही प्रयोजन महत्त्वाचे आहे.
 
 

मत्स्यपुराण  
 
भगवान ब्रह्मदेव योगनिद्रेत असताना त्यांच्या मुखातील वेद हयग्रीव नावाच्या दैत्याने योगबलाने ग्रहण केले आणि तो पाताळात निघून गेला.(हयग्रीव दोन आहेत. एक हा दैत्य आणि दुसरे हयग्रीव रूपातील भगवान विष्णू. या कथेतील हयग्रीव दैत्य आहे.)
त्याच वेळी प्रलयकाळ जवळ येत होता. प्रलयानंतर पुन्हा सृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेव वेदाचे साहाय्य घेत असतात. वेद हयग्रीव दैत्याने पाताळात नेले. वेद नसतील तर सृष्टीची पुनर्रचना कशी करावी? हा प्रश्न सर्वांसमोर होता. त्यामुळे भगवंताच्या अवताराचे प्रयोजन ठरले. हयग्रीव राक्षसाचा वध करून वेद रक्षण करणे. त्याकाळात सत्यव्रत नावाचे राजर्षी होते. (पुढे ते वैवस्वत मनु म्हणून प्रसिद्ध झाले) ते सत्यव्रत कृतमाला नदीवर स्नान संध्या तर्पण करीत असताना त्यांच्या ओंजळीत एक छोटीशी मासळी आली आणि ती मनुष्याप्रमाणे राजे सत्यव्रत यांना आर्जव करू लागली की, हे राजन! मला मोठ्या माशांपासून वाचवा.
सत्यव्रत राजर्षींनी त्या मासळीला कमंडलूत टाकले आणि आश्रमात आणले. तिला अनुक्रमे माठात, विहिरीत, सरोवरात, नदीत टाकले पण प्रत्येक ठिकाणी ती मोठी मोठी होत त्या त्या ठिकाणी मावेनाशी झाली. अखेर सत्यव्रतांनी तिला समुद्रात टाकले. तिथेही ती इतकी प्रचंड मोठी झाली की समुद्रातही मावेना.
आता सत्यव्रत राजे तिला शरण जाऊन आपण कोण आहात, असे विचारते झाले. आता त्या मासोळीने भगवान विष्णुरूपात राजांना दर्शन दिले आणि सांगितले की, हयग्रीव नावाच्या दैत्याने वेद पाताळात पळवून नेले आहेत आणि इथे तर आजपासून सातव्या दिवशी प्रलय येणार आहे. सर्व पृथ्वी जलमय होणार आहे. सर्व जीवसृष्टी समूळ नष्ट होणार आहे. त्या स्थितीत जीवसृष्टी कायम राहावी म्हणून वेद आवश्यक आहेत. वेद पाताळात हयग्रीव दैत्याजवळ आहेत.
वेद परत येईपर्यंत तुला एक कार्य करायचे आहे. हे सर्व जग जेव्हा पाण्यात डुंबून जाईल तेव्हा हे सत्यव्रत राजर्षी, मी एक प्रचंड नौका पाठवेल. त्या नौकेत सप्तर्षींसह जीवांश या नौकेत घेऊन आपण बसा. वासुकी नागराजांना पाचारण करा. मी मत्स्यरूपात हयग्रीव दैत्याला परास्त करून तुमच्या रक्षणासाठी येईल. मला एक शृंग म्हणजे शिंग असेल. त्या शिंगाला तुम्ही नागराज वासुकीचे मुखाने बांधा आणि त्यांची शेपूट नौकेला बांधा. प्रलयातून मी तुम्हाला सुखरूप बाहेर काढेन, तुमचे रक्षण करेन. दरम्यानच्या काळात प्रलय संपेपर्यंत मी तुम्हाला गुह्यज्ञान देखील सांगेल. त्यानंतर प्रलय थांबताच नूतन सृष्टी निर्माण करू.
पुढे तसेच घडले. मत्स्य भगवंतांनी हयग्रीवाचा वध केला. प्रलयकाळात नौकेला वाचविले. नंतर प्रलय ओसरल्यावर नौका काठाला सुखरूप लावून सर्वांना वाचविले आणि पुन्हा सृष्टीची रचना सत्यव्रत म्हणजे वैवस्वत मनु यांच्या साहाय्याने केली. अशी मत्स्यपुराणाची मूळ कथा आहे.
‘‘पुराणातील वांगी पुराणात’’ अशी म्हण उपहास किंवा उपरोधाने आपण नेहमी वापरतो. पण ती वांगी नसून पुराणातील वानगी आहे. त्याचा सकारात्मक अर्थ घेतला तर पुराणात जे आहे ते इतर कोणत्याही साहित्यात क्वचितच मिळण्याची शक्यता आहे. मत्स्यपुराणाचा विचार केला तर 14000 श्लोक संख्या असलेल्या या पुराणात 291 विषयांचा विचार केला आहे. विशेष म्हणजे त्यातील बहुतांश विषय आजच्या काळातही उपयुक्त आहेत. ग्रहांच्या हालचाली, त्याचे जीवसृष्टीवर होणारे इष्ट आणि अनिष्ट परिणाम. हे विज्ञानाच्या कसोटीवर आजही सिद्ध आहे.
आयुर्मान वाढविण्यासाठी विविध उपाय, राजधर्म, शासन व्यवस्था, साहित्यिक दृष्टिकोन, शासकीय कर्मचाèयांची निवड करतानाची मापदंडे अशी अनेक प्रकरणे मत्स्यपुराणात आहेत. ती आताही लागू पडतात. मत्स्यपुराणातील राजधर्म तर राज्याच्या सीमा, राजाची कर्तव्ये, प्रजापालन, भौतिक सुविधा, सरंक्षण विचार, किल्ल्यांचे प्रकार याचा विचार करतो. राजाने कावळ्यासारखे सावध आणि शंकायुक्त राहावे. राजाने कुठे खावे, झोपताना कोणती काळजी घ्यावी, स्नान करताना आधी तलावाचे परीक्षण या सर्व संरक्षणात्मक बाबी आजच्या काळातही महत्त्वाच्या आहेत.
याशिवाय विविध धार्मिक विधी, मंदिरे ही सामाजिक स्वास्थ्याची केंद्रे आहेत. त्यामुळे त्याचे वास्तुशास्त्र, विविध संस्कार यांचाही विचार आहे. मयासूर हा त्यावेळीचा स्थापत्य पारंगत त्याचा उल्लेख इथे आहे. आजकाल इंटीरियर डेकोरेशनच्या अभियंत्यांनी या पुराणात शिरून भर टाकण्याची गरज आहे. ते मत्स्यपुराणात आहे.
संसार आनंदी असावा म्हणून पतीचा धर्म, पतिव्रतेचा धर्म, पुरुषार्थ म्हणजे काय हा विचारही याच पुराणात सांगितला आहे. गृहनिर्माण, वास्तुकला, मूर्तिकला, चित्रकला, स्वप्नशास्त्र, रत्नविज्ञान या सर्वांबाबत चिंतन मत्स्यपुराणात आहे. मत्स्यपुराणातील काही प्रकरणे मत्स्यपुराणाचा परिचय करून देतात. जसे या पुराणात मत्स्यावतार कशासाठी यावर प्रकरण आहे. त्यात बीजरक्षणाचा विचार आहे. मत्स्यभगवान आणि मनु यांचा ज्ञानयोग संवाद आहे. सृष्टी प्रकरणात जीवसृष्टीचा विचार आहे. सरस्वती चरित्र, कश्यपान्वय, पृथु आणि त्यावरून पृथ्वी वर्णन आहे. मनुवरून मन्वंतर ही कालगणना, मनुचे पुत्र, आदित्य आख्यान, देवीची 108 नावे याचा समावेश मत्स्यपुराणात आहे.
सूर्यवंश, यदुवंश, पुरूवंश, कुरूवंश, ययाती वंश, अग्निवंश, चेदी, पांचाळ, मगध, कोशल या प्रदेशातील वंशाची माहिती यात दिली आहे. आणि भारत देश एकसंध ठेवण्याचा संदेश इथेच सापडेल. या पुराणात श्राद्ध प्रकरण असून विविध विधी आहेत. विविध व्रतांचाही विचार इथे मांडला आहे.
कर्मयोग, सांख्ययोग असे विविध योग याशिवाय अष्टांगयोगही सांगितला आहे. ग्रहशांती, ज्योतिष चक्र, विविध विधी आणि सण उत्सव यावरही विचार आहे. विशेष म्हणजे भारतवर्ष म्हणजे भारताचे वर्णन इथे आहे. कैलास पर्वताचे वर्णन, प्रयाग क्षेत्राचे वर्णन, हिमालय, नर्मदा याबाबतही वर्णन आहे. तीर्थ आणि तीर्थस्नानाचे महिमान, विविध प्रकारचे दान या पुराणात सांगितले आहेत.
श्रीकृष्ण उत्पत्ती वर्णन, स्यमंतक मणी, कृष्ण संतान, सावित्री उपाख्यान, यम सावित्री संवाद, कच देवयानी चरित्र, कुमार कार्तिकेय जन्म हा ‘‘इतिहासं पुरातनम्’’ मांडला आहे. पाणी व्यवस्थापन सांगताना दहा विहिरी म्हणजे एक तलाव होय. असे दहा तलाव म्हणजे एक जलाशय होय. असे जलमहत्त्व आणि जलनियोजन यात आहे. एक वृक्ष दहा पुत्रांची बरोबरी करतो हा सृष्टिविचार अनन्यसाधारण आहे. याच पुराणात माणुसकीचे धडेही आहेत. संकट काळात इतरांना मदत, ‘भूतां परस्परे जडो मैत्र जिवाचे’ हा विचार मत्स्य पुराणातील. अन्नदानाचे महत्त्व येथूनच समजते.
थोडक्यात, या पुराणात भारतीय मूल्ये, भारतीय भूगोलाचे सौंदर्य, भारतीय वातावरण, निसर्ग वर्णन दिले आहे. इथेच व्रत, पर्व, तीर्थ आणि विविध भारतीय वंशाचा विचार आहे. याच पुराणात बीजरक्षणाचे विज्ञान मांडले आहे. पर्यावरण, राजव्यवस्था, साहित्य, कला आणि संस्कृती यांचा अनोखा संगम म्हणजे मत्स्यपुराण होय.
अठरा पुराणे ही आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीचा वसा आहेत. यात आपली जीवनमूल्ये, आपली सनातन संस्कृती, आपला उदार हेतू दिलेला आहे. पुराण अभ्यासणारा हा अध्यात्म विज्ञानाचा पुरस्कर्ता ठरेल. पुराणांकडे हीन दृष्टीने पाहणारे चूक करताहेत असे माझे मत आहे. पुराणातील वांगी म्हणणारांनी पुराणातील वानगी तपासा मग आपोआप पुराणांचे महत्त्व सर्वांना कळेल. मत्स्यपुराण हे त्यासाठी महत्त्वाचे वाङ्मय ठरेल.
 
प्रा. दिलीप जोशी