नवी दिल्ली,
The journey started by Dhoni इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या लिलावासाठी सर्व फ्रँचायझी सज्ज झाल्या असून 16 डिसेंबर रोजी अबूधाबी येथे हा भव्य लिलाव पार पडणार आहे. दुपारी 2.30 वाजता होणाऱ्या या लिलावासाठी 1390 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी 350 जणांची अंतिम यादी जाहीर झाली असून याच खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यावेळी कोणत्या खेळाडूवर किती ‘बिड’ लागते याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. IPL लिलावाचा इतिहास नेहमीच नव्या विक्रमांनी गाजलेला आहे. प्रत्येक वर्षी फ्रँचायझी विजेतेपदाची शक्यता वाढविण्यासाठी दमदार खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. 2008 पासून ते 2025 पर्यंतच्या लिलावांचा मागोवा घेतला असता खेळाडूंच्या किमती सतत वाढल्याचं स्पष्ट दिसतं. यामध्ये अनेकदा जुने विक्रम मोडले गेले आणि नवे शिखर गाठले गेले.

2008 मध्ये या प्रवासाची सुरुवात महेंद्रसिंग धोनीवर सर्वाधिक बोली लागून झाली. चेन्नई सुपर किंग्जनं त्याला तब्बल 1.5 दशलक्ष डॉलरमध्ये घेतलं आणि पुढील दशकभर IPLवर त्याने वर्चस्व गाजवलं. 2009 मध्ये केविन पीटरसन आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्यासाठी 1.55 दशलक्ष डॉलरची बोली लागली. तर 2010 मध्ये किरॉन पोलार्ड आणि शेन बॉन्ड 7.5 लाख डॉलरमध्ये विकत घेण्यात आले, 2011 पासून खेळाडूंची किंमत प्रचंड वाढू लागली. त्या वर्षी गौतम गंभीर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाइट रायडर्सनं त्याच्यासाठी 11 कोटींहून अधिक रक्कम खर्च केली. 2012 मध्ये रवींद्र जडेजाला 2 दशलक्ष डॉलर मिळाले, तर 2013 मध्ये ग्लेन मॅक्सवेल हा वर्षाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
IPL लिलावातील एक विशेष अध्याय म्हणजे युवराज सिंग. 2014 आणि 2015 या दोन्ही वर्षांत तो सर्वाधिक किमतीत विकला जाऊन नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले. 2014 मध्ये त्याला 14 कोटी तर पुढील वर्षी तब्बल 16 कोटी रुपये मिळाले. 2017 आणि 2018 मध्ये बेन स्टोक्ससारख्या अष्टपैलू खेळाडूंना प्रचंड मागणी होती. त्याला अनुक्रमे 14.5 आणि 12.5 कोटी मिळाले. 2020 पासून लिलावातील ट्रेंड बदलू लागला. परदेशी वेगवान गोलंदाजांना मोठी किंमत मिळू लागली. पॅट कमिन्स (15.5 कोटी), ख्रिस मॉरिस (16.25 कोटी) आणि सॅम करन (18.5 कोटी) हे त्याची प्रमुख उदाहरणं. 2024 आणि 2025 मध्ये हा नवा प्रवाह अधिक ठळकपणे दिसला. 2024 मध्ये मिचेल स्टार्कने 24.75 कोटींच्या बोलीसह सर्वकालीन विक्रम केला होता. मात्र त्याही पुढे जात 2025 मध्ये ऋषभ पंतवर लागलेल्या 27 कोटींच्या बोलीने भारतीय खेळाडूंच्या वाढत्या ब्रँड व्हॅल्यूची नवी उंची ठरवली.