नवी दिल्ली,
Tirupati-Shirdi Railway Service केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी नवी दिल्लीतील रेल भवनातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिरुपती–साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताच आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो साईबाबा व बालाजी भक्तांसाठी नवी सोय उपलब्ध झाली. तिरुपतीपासून शिर्डीपर्यंतची पहिली थेट रेल्वे सेवा सुरू झाल्याने दोन्ही प्रमुख तीर्थक्षेत्रे आता एका साखळीत जोडली गेली आहेत. या नवीन साप्ताहिक गाडीमुळे प्रवाशांसाठी सुमारे 30 तासांचा एकेरी प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि अखंड होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, नव्या सेवेने या चार राज्यांमधील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार असून तीर्थयात्रेतील प्रवाह वाढेल, पर्यटनाला गती येईल आणि रेल्वेमार्गावरील आर्थिक घडामोडींनाही नवे वळण मिळेल. भारतीय रेल्वे केवळ वाहतुकीचे साधन नसून देशातील विविध संस्कृतींना जोडणारी जीवनरेखा असल्याचेही सोमन्ना यांनी उद्घाटनावेळी सांगितले.
या गाडीला एकूण 31 थांबे असून नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर आणि मनमाडसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. शिवभक्तांसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले परळी वैजनाथही आता या मार्गावरून थेट जोडले गेले आहे. तिरुपतीत 312 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प, त्यात तिरुपती अमृतस्थानाचा समावेश असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. महाराष्ट्रात या गाडीचे थांबे शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, गंगाखेड, परळी आणि लातूर रोड या ठिकाणी असणार आहेत. या जोडणीमुळे राज्यातील भाविकांसाठी तिरुपतीकडे जाण्याचा प्रवास अधिक सहज आणि जलद होणार आहे.