खूनप्रकरणातील दोघांना अटक

* गुन्हे शाखेची कारवाई

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
murder-case : जुना पुलगाव येथील श्री. संत गजानन महाराज संस्थान येथे कामावर असलेले रामराव देवतळे (७०) रा. विरुळ (आकाजी) यांना जुन्या वादातून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर पोटावर वार करून गंभीर जखमी केले होते. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने दोघांना अटक केली आहे.
 
 
k l
 
प्रज्वल खराणे (१९) रा. आर्वी नाका आणि गजानन काळे रा. भांडेकर लेआऊट सिंदी (मेघे), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
श्री संत गजानन महाराज संस्थान, जुना पुलगाव येथे रामराव देवतळे कामावर होते. ते मंदिरात असताना अज्ञात इसमांनी त्यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. परिसरातील नागरिकांनी त्यांना पुलगाव येथे उपचारार्थ दाखल केले होते. पुढील उपचारार्थ त्यांना सेवाग्राम व नंतर नागपूर येथे हलविले तिथे उपचारादरम्यान मंगळवार ९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
 
 
गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी अज्ञात फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले. गुन्हे पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी केली. मृतक रामराव देवतळे यांच्या लहान भावाच्या पत्नीचा पती मरण पावल्याने तिने तिच्या नात्यातील गजानन काळे रा. भांडेकर लेआऊट सिंदी (मेघे) याच्यासोबत ऐकमेकांच्या गळ्यात हार घालून विवाह केला होता. या कारणातून मृतकाने त्याचे भावाची पत्नी व तिचे वडील किसना शिंदे, रा. विटाळा, जि. अमरावती यांना दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते.
 
 
गजानन काळे याचा शोध घेतला असता तो रोहणी शेत शिवारात मिळून आला. या गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता त्याने त्याच्या पत्नीसोबत केलेल्या कृत्याचा राग मनात धरला व प्रवीण वानखेडे, रा. कावली वसाहत, जि. अमरावती ह. मु. मुंबई व प्रज्वल खराणे यांच्यासह कारने पुलगाव येथे गेले. रामराव देवतळेला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकूने वार केल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी प्रज्वल खराणे व गजानन काळे या दोघांना अटक केली.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, राहुल इटेकार, पोलिस अंमलदार मनोज धात्रक, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, अमोल नगराळे, मंगेश चावरे, विनोद कापसे, मंगेश आदे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे यांनी केली.