वर्धा,
municipal-council-elections : वर्धेत नगर पालिकेच्या निवडणुका आल्या की महेश तेलरांधे आणि प्रदीपसिंग ठाकूर हा वाद चव्हाट्यावर येतो. यावेळी तर हा वाद नप, जिल्हा न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. निकाल ठाकूरच्या बाजूने लागला. त्यानंतरही आज पुन्हा ठाकूर यांच्या विरोधात तेलरांधे यांनी पत्रकार परिषद घेतली. निवडणुका आणि दोघांची जुगलबंदी वर्धेकरांकरिता नवीन राहिली नाही.
इंदिरा मार्केटमध्ये नगरपरिषदेने सन १९९५ मध्ये २८ गाळ्यांची निर्मिती केली. मात्र, तत्कालीन नगरपरिषद उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर यांनी सत्तेचा दुरुपयोग करून २८ पैकी २० ते २२ गाळे स्वत:च्या कुटुंबाकडेच ठेवले असून याला नगरपरिषद प्रशासनाचेही पाठबळ असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेश तेलरांधे यांनी आज सद्भावना भवनात आयोजित पत्रपरिषदेत केला.
इंदिरा मार्केटमधील नपच्या मालकीचे २८ गाळे आहेत. त्यापैकी ११ गाळे पालिकेच्या दप्तरी मिळकत विभागून गायब झाले आहे. या गायब झालेल्या गाळ्यांवर प्रभाग ९ ब चे उमेदवार व माजी नप उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर व त्यांच्या कुटुंबातील दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंग ठाकूर, किशोरसिंग ठाकूर व ठाकूर यांचे कर्मचारी मंगेश भातुकुलकर यांनी बेकायदेशीररित्या कब्जा केला असल्याचा आरोप त्यांनी केला. ११ गाळ्यांपैकी २८ क्रमांकाचा गाळा प्रदीपसिंह ठाकूर यांच्याकडे आहे. मात्र, २८ क्रमांकाचा गाळा शती एजन्सीच्या नावे असून त्या एजन्सीशी आपला संबंध नसल्याचे प्रदीपसिंह ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना २१ नोव्हेंबर २०११ रोजी कळविले होते. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, सुधीर पांगुळ, अविनाश काकडे उपस्थित होते.
न्यायालयापेक्षा तेलरांधे मोठे का : ठाकूर
तेलरांधे यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रदीपसिंग ठाकूर यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, तेलरांधे यांनी २०१६ मध्येही नगर पालिकेच्या निवडणुका येताच हेच आरोप केले होते. २०२५ च्या नगर पालिका निवडणुकीतही त्यांनी तेच आरोप केले आहेत. यावेळी नगर पालिकेत अपिल दाखल केली होती. त्यानंतर हा वाद जिल्हा न्यायालयात गेला. आपणही सर्व पुरावे सादर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला. तेलरांधे यांनी न्यायालयात दाद मागितल्यानेच या प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. न्यायालयाने आपल्या बाजून निकाल दिला तेव्हाच आपण उमेदवार कायम आहोत. तेलरांधे न्यायालयापेक्षा मोठे झाले का असा सवालही ठाकूर यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. या प्रकरणात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना २०२३ ला राज्य शासनाने लिन चिट दिली आहे. नप निवडणूक प्रक्रियेदरम्यान तेलरांधे यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. हे सर्व आरोप व्यक्तिगत द्वेष आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याची प्रतिक्रीया ठाकूर यांनी दिली.