तळेगाव (श्या.पं.),
shivai-bus-hits-road-roller : नजिकच्या चिस्तूर जवळ अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवाई बसने रोड रोलरला मागून जबर धडक दिली. यामध्ये रोड रोलरचा चुराडा झाला असून चालक गंभीर जखमी झाला. अपघात घडताच शिवाई बस सुद्धा रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याने बसचालकासह १६ प्रवासी जखमी झाले. ही घटना आज बुधवार १० रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती आगाराची एम. एच. ४९ बी. झेड. ६८३६ क्रमांकाची शिवाई बस अमरावतीवरून नागपूरला ३३ प्रवासी घेऊन जात होती तर रोड रोलर हा चिस्तूरवरून तळेगावला जात होता. दरम्यान, चिस्तूर बसस्थानकापासून काही अंतरावर मागून येणार्या शिवाई बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे रोड रोलरला जबर धडक दिली. यामध्ये रोड रोलरचे समोरील चाक तुटून रोलरचे इंजिन चकाचूर झाले. रोड रोलरचा चालक श्रीकृष्ण उईके (५७) रा. आष्टी हे गंभीर जखमी झाले. तर बस रस्त्याच्या डाव्या कडेला जाऊन झाडावर आदळून पलटल्याने बस चालक सूरज पोटे (३०) रा. दर्यापूर, वाहक अशोक बोरकर (५४) रा. अमरावती यांच्यासह बसमधील १६ प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना पोलिस व नागरिकांच्या मदतीने तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून काहींना सुटी देण्यात आली तर चार प्रवाशांना आर्वी तर एका महिला प्रवाशाला अमरावती येथे हलविण्यात आले. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली. पुढील तपास ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक किशोर खंडार, राजेश जयशिंगपुरे, अतुल अडसड व सहकारी करीत आहे.