समुद्रपूर,
tiger-cub-terror : तालुक्यातील गिरड-खुर्सापार परिसरात गेल्या ११ महिन्यांपासून एक वाघीण, तीन पिल्लं आणि एक वाघ अशा पाच वाघांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंत कोणत्याही मानवाला इजा पोहोचवली नसली तरी अनेक जनावरांचा फडशा या वाघांनी पाडला आहे. आता तर वाघांच्या पिल्लांनीही जनावरांची शिकार करायला सुरुवात केली असून शिरपूर शिवारात पहिल्यांदाच यातील एक पिलाने दोन शेळ्यांना ठार केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज १० रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रशांत जुगनाके यांच्या शेळ्या शिरपूर शिवारात चरत असताना वाघाच्या पिलाने दोन शेळ्यांवर हल्ला चढवून ठार केले. हे सर्व दृश्य शेतात काम करीत असलेल्या मजुरांनी पाहिले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गांवडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक पि. डी. बेले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहे. या हल्ल्यात शेतकर्याचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाघांचा शेत शिवारात वावर लक्षात घेऊन शेतकरी व मजुरांना खबरदारी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गांवडे यांनी केले आहे.