नागपूर,
Abu Azmi हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी आणि रईस शेख यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बॅनर झळकवत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, कापूस-सोयाबीनला योग्य भाव मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात भाषण करताना अबू आजमी म्हणाले, “आपला देश शेतकरी प्रधान आहे. मी उत्तर प्रदेशात जन्मलो असून शेतकरी कुटुंबातून आहे. संसद असो किंवा विधानभवन, शेतकऱ्यांबद्दल सर्वच पक्षातील नेत्यांकडून चर्चा होते, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काही मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामीण भागातील नागरिक शहराकडे धाव घेत आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “शेतकरी दिवसभर शेतात काम करतो, परंतु त्याला दिवसाची मजुरी इतकी मिळत नाही. सरकार केवळ मोठमोठे आश्वासन देते, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. अमेरिकेत शेतकऱ्यांना भरपूर अनुदान आणि सवलत दिली जाते, पण आपल्याकडे हे काहीच नाही.”
आंदोलनात सहभागी विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप करत “फडणवीस नव्हे, फसणवीस सरकार आहे”, “सोयाबीनला नाही भाव, सत्तेसाठी महायुतीची धावाधाव”, “कर्जबाजारी शेतकऱ्याला तर काहीच मिळत नाही, पॅकेज फडणवीसांचं फसवणूक असतंय” अशा घोषणाबाजी केली. विरोधकांनी कापसाच्या बोंडाच्या माळा घालून ‘सरकार तुपाशी, शेतकरी उपाशी’ अशी घोषणाही केली.यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुनील प्रभू, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, सिद्धार्थ खरात, प्रवीण स्वामी, काँग्रेसचे सतेज पाटील आणि अस्लम शेख यांची उपस्थिती देखील होती.आंदोलनात विरोधकांनी सरकारला तातडीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पीकांचे योग्य भाव आणि ग्रामीण अर्थकारण सुधारण्यासाठी प्रभावी योजना राबवण्याचे आवाहन केले. शेतकरी समुदायाचे उत्पन्न वाढीसाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी अशी उपाययोजना आवश्यक असल्याचे ते म्हणाले.