पाच वर्षात दोघांचा बळी

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
चंद्रपूर, 
stray-dogs : महानगरासह चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, गेल्या पाच वर्षात त्यांन हैदोस मांडला आहे. एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2025 च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोकाट कुत्र्यांनी जिल्ह्यातील तब्बल 44 हजार 299 लोकांना चावा घेऊन जखमी केले आहे. तर या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यूही झाला आहे.
 
 

DOG 
 
 
भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट हा रोजच्या जगण्याला भेडसावणारा गंभीर प्रश्न आहे. शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांवर, कामावर जाणार्‍या महिलांवर आणि वृध्दांवर हे भटके कुत्रे हल्ला करतात. वेगाने जाणार्‍या मोटारसायकलवर ते तुटून पडतात. वाहनचालकाचा तोल जातो आणि तो जखमी होतो. कुत्र्यांच्या चावल्याने रेबीजचा धोका असतो आणि त्यात मानसाचा मृत्यूही होऊ शकतो. चंद्रपूर जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत.
 
 
मोकळे मैदान, रस्ते, चौक हे या भटक्या कुत्र्यांचे अड्डे बनले आहे. शहरात तसेच गावोगाव कुंत्र्याचा झुंड दादागीरीने फिरताना दिसतो. रस्यावरील वाहनांचा पाठलाग करणे, लहान मुलांच्या मागे लागून त्यांना चावा घेणे अशा घटना सतत घडत आहे. मोकाट कुत्रे ही सद्यस्थितीत गंभीर समस्या बनली आहे. चंद्रपूर जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालात दाखल झालेल्या प्रकरणानुसार, जिल्ह्यात एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत 44 हजार 299 लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला असून, दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 
 
उपलब्ध माहितीनुसार, 2021 ते 2022 मध्ये 7 हजार 750 जणांना भटके कुत्रे चावले आहेत. तर कुत्र्याचा हल्ल्यात त्या वर्षी एकाला आपला जीव गमवावा लागला होता. 2022 ते 2023 मध्ये 7 हजार 504 जणांना कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले. 2023-2024 या कालावधीत कुत्र्यांनी 10 हजार 291 जणांचे लचके तोडले, तर त्याही वर्षी एकाचा मृत्यू झाला. हा आकडा 2024-2024 मध्ये 10 हजार 977 इतका झाला होता. यंदा नोव्हेंबर 2025 पर्यंतच 7 हजार 777 लोक कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक असून, सध्या हा विषय विधीमंडळातही गाजतो आहे. प्रशासनाने कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम राबवणे. त्यांना पकडून त्यांच्या निवार्‍याची व्यवस्था करणे, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखणे जेणेकरून त्यांना खाद्य मिळू नये आदी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 
रुग्णालयात ‘अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सीन व सिरम’ उपलब्ध: डॉ. चिंचोळे
 
कुत्रा चावल्यास वेळीच उपचार केला तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. कुत्र्यामुळे जखमी झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सध्या 7 हजार 488 ‘अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सीन’, तर ‘169 अ‍ॅन्टी रेबीज सिरम’ उपलब्ध आहे. कुत्रा चावल्यास लोकांनी कुठल्याही मांत्रिकाकडे धाव न घेता, रुग्णालात जाऊन योग्य उपचार घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना केले.