संसदेत ई-सिगारेटवरून रणकंदन!

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Chaos in Parliament over e-cigarettes संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एका अनोख्या आरोपामुळे लोकसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने सभागृहात ई-सिगारेट ओढल्याचा आरोप केल्यानंतर परिस्थिती तापली. देशात ई-सिगारेटवर बंदी असतानाही संसदेत असा प्रकार घडल्याचे ठाकूर यांनी सभापती ओम बिर्ला यांच्याकडे निदर्शनास आणून दिले.
 
 
 
anurag thakur cigarettes
लोकसभेत हा मुद्दा उपस्थित होताच भाजप खासदारांनी संबंधित सदस्यावर तातडीने कारवाईची मागणी केली. गोंधळ वाढत असताना सभापतींनी खासदारांना सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की, लेखी तक्रार मिळाल्यास नियमांनुसार चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल. अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ई-सिगारेटवर संपूर्ण देशात बंदी घालण्यात आली असून संसदेसारख्या सर्वोच्च संस्थेत असा प्रकार घडणे पूर्णपणे अनुचित आहे.
 
 
संसदेशी निगडित शिष्टाचार आणि नियमांचे उल्लंघन होईल असे कोणतेही वर्तन स्वीकारार्ह नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. सभापती ओम बिर्ला यांनीही हा मुद्दा गंभीर असल्याचे नमूद करत संसदीय शिष्टाचार मोडणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी आश्वासन दिले की, या प्रकरणाची सखोल तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.