नागपूर,
Discussion on excessive rainfall राज्यातील अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानभवनात आज चर्चा आयोजित करण्यात आली होती. मात्र या गंभीर चर्चेला दुग्ध, कृषी आणि महसूल या महत्त्वाच्या विभागांचे मंत्रीच गैरहजर राहिल्याने सत्ताधारी व विरोधक दोघांच्याही नाराजीत भर पडली. शिवसेना (ठाकरे गट) चे नेते भास्कर जाधव यांनी या अनुपस्थितीवर जोरदार टीका करत सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्र्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आश्चर्य म्हणजे, भाजपच्या काही आमदारांनीही मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी नोंदवली.

अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकार दोघांवरही तीव्र प्रहार केला. एनडीआरएफचे निकष वाढवले गेले आहेत का? कापूस, संत्री, कांदा यांसारखी पिके पूर्णपणे नष्ट झाली असताना सरकार कोणती ठोस मदत देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर कोकणातील मोठ्या प्रमाणातील नुकसानीकडेही त्यांनी लक्ष वेधले. केंद्रीय पथकाच्या पाहणीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “पथक दिवसा आलं का? त्यांची पाहणी कितपत गंभीर होती? असा खोचक सवाल करत त्यांनी केंद्राच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. पुरवणी मागण्यांतील मोठ्या रकमेचा उल्लेख करत जाधव म्हणाले की, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमधून राज्याची आर्थिक अवस्था ढासळल्याचं स्पष्ट दिसत आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या मदतपॅकेजबाबतही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
तीन-चार हेडखाली दिलेली मदत म्हणजे पॅकेज नव्हे. हे फसवे पॅकेज आहे. शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकार 32 हजार कोटींच्या पॅकेजचा दावा करत असलं तरी सभागृहात त्याची स्पष्टता दिली जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले. अतिवृष्टीमुळे नद्यांनी जमीन वाहून नेली, अनेक ठिकाणी शेतजमीनच नाहीशी झाली. अशा परिस्थितीत एका हंगामापुरती मदत अपुरी ठरणार असून दीर्घकालीन योजना आवश्यक असल्याचे जाधव यांनी सांगितले. चर्चा केवळ भाषणापुरती न ठेवता ठोस उपाययोजना करणे हीच वेळेची गरज असल्याचं ते म्हणाले.