ढाका,
Group formation in South Asia भारताशिवाय दक्षिण आशियात एक नवीन प्रादेशिक युती स्थापन करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना बांगलादेशच्या पाठिंब्यामुळे लक्षणीय यश मिळाले आहे. बांगलादेशने या गटात सामील होण्याची तयारी दर्शविली असून, भारताचा समावेश नसलेल्या गटाचा भाग होण्यास ढाकाला कोणतीही अडचण नाही, असे बांगलादेशच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले आहे. एका वृत्तानुसार, बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहिद हुसेन यांनी बुधवारी सांगितले की पाकिस्तानसोबत एक प्रादेशिक गट स्थापन केला जाऊ शकतो, परंतु भारत त्याचा भाग राहणार नाही. या टिप्पण्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांनी मांडलेल्या त्रिपक्षीय पुढाकाराशी संबंधित आहेत, ज्यामध्ये बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.
पाकिस्तान आणि चीनसोबतच्या या गटात सामील होण्याबाबत तौहिद हुसेन म्हणाले, बांगलादेशसाठी धोरणात्मकदृष्ट्या हे शक्य आहे, परंतु नेपाळ किंवा भूतानने भारत सोडून पाकिस्तानसोबत गट स्थापन करणे शक्य नाही. त्यांनी असेही सांगितले की, दार यांनी सांगितलेल्या योजनेला भविष्यात प्रगती मिळू शकते. अलीकडील काही महिन्यांत पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध सुधारले आहेत, तर दिल्ली आणि ढाक्यातील संबंध झपाट्याने बिघडले आहेत. बांगलादेशमध्ये मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून इस्लामाबादचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, पाकिस्तान भारताशिवाय या प्रदेशात एक मजबूत युती तयार करण्यासाठी चीन आणि बांगलादेशला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे भारताचे प्रादेशिक महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग मानला जात आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अलीकडेच सांगितले की बांगलादेश, चीन आणि पाकिस्तान यांच्यात त्रिपक्षीय उपक्रम सुरू करण्यात आला आहे आणि हा उपक्रम इतर प्रादेशिक देशांमध्ये आणि त्यापलीकडे वाढवता येऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावामुळे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC) निष्क्रिय झाली असून, इस्लामाबादला भारताला वगळून एक स्वतंत्र प्रादेशिक गट हवे आहे. या वर्षी जूनमध्ये, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील राजदूतांनी प्रादेशिक स्थिरतेवर चर्चा करून नवीन गट तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. आता पाकिस्तान या उपक्रमाचा पाठपुरावा करत असून, भारताशिवाय दक्षिण आशियात सार्कसारखा गट तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, बहुतेक दक्षिण आशियाई देशांना भारताशिवाय नवीन प्रादेशिक गटात सामील होण्यासाठी राजी करणे हे एक मोठे आव्हान ठरणार आहे.