वेध
healthy communication समाजात घडणाऱ्या काही घटना मन अस्वस्थ करणाऱ्या असतात. आपले पारंपरिक मूल्य, कुटुंब व्यवस्था यात गतीने होत असलेल्या बदलांची पुन्हा चिंतन करण्याची गरज असल्याची आठवण हे प्रसंग करून देतात. अकोला शहरातील खदान परिसरात राहणारा 14 वर्षीय मुलगा 11 नोव्हेंबरला घरून कुणालाही न सांगता निघून गेला. पोलिसांनी अक्षरश: 200 सीसीटीव्ही फुटेज तपासले. 7 जिल्ह्यांत दीड हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करून दीडशे ते दोनशे जणांना विचारपूस केली आणि त्यानंतर या मुलाचा शोध लागला. पोलिसांनी 21 दिवस केलेल्या शोधमोहिमेचा शेवट सुखकारक होता. 14 वर्षीय बालक त्याच्या कुटुंबात परतल्यानंतर त्याच्या आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील संमिश्र भाव बरेच काही सांगत होते. तर दुसरी घटना उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शाळेतील. या शाळेत 13 वर्षीय विद्यार्थिनीला शाळेतीलच वरच्या वर्गात असणारा विशिष्ट समाजाचा मुलगा त्रास देत होता. या संदर्भातील तक्रार तिने कुटुंबीयांकडे केली होती. कुटुंबीयांनी देखील या संदर्भातील माहिती शाळेत दिली. पण अचानक तिने आत्महत्येचा मार्ग स्वीकारत जीवन संपविले. या दोन्ही घटना कुटुंबातील मोकळा संवाद कमी झाल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने अशा घटना, प्रसंग केवळ अपवाद नसल्याने अधिक चिंतेची बाब आहे.
भौतिक प्रगती गतीने होत आहे. त्यातच गेल्या काही दशकात जग जवळ आले असे म्हटले जाते. मोबाईल आणि समाजमाध्यमांचा अंमल सतत वाढता आहे. या बदलांचे काही अंशी चांगले परिणाम असले तरी व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद कमी होत असल्याचा दुष्परिणाम चिंताजनक आहे. त्यातच आता कुटुंबातील संवादही कमी झाल्याचे दिसून येते. खरं म्हणजे कुटुंबातील संवाद म्हणजे केवळ मौखिक होणारा संवाद नव्हे. तर मौखिक संवादाशिवाय अमौखिक संवाद, भावनिक संवाद देखील महत्त्वाचा असतो आणि असा संवाद ही प्रत्येक कुटुंबात सहज होणारी बाब होती. पण आता अगदी सहज होणाऱ्या संवादाची जागा समाज माध्यमाने व्यापली आहे. संवादाऐवजी लहान असो की मोठा तो सतत मोबाईलमध्ये गुुंतून पडला आहे. ‘घरात सर्वच असतात पण एकमेकांपासून दूर’ अशी निर्माण झालेली स्थिती अनेक प्रश्न उत्पन्न करते. जिथे संवादच खुंटला असेल तिथे संस्कारांची रुजवण तरी कशी होईल. व्यक्ती निर्माणासाठी आवश्यक असलेली कुटुंबातील बलस्थाने कमकुवत होणे हे समाज स्वास्थ्यासाठी धोकादायक आहे. म्हणून वेळीच सावध होण्याची आणि योग्य उपाययोजनांची आवश्यकता ओळखली पाहिजे.
खरं म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया हा कुटुंब व्यवस्थेवर भक्कम उभा आहे. त्यातही संयुक्तकुटुंबपद्धती हे तर आपले वैशिष्ट्यच. पण कालौघात संयुक्त असलेले कुटुंब चौकोनी तर आता त्रिकोणी झाले आहे.healthy communication कुटुंब व्यवस्थेतून जीवनमूल्यांची रुजवण, नकळत होणारे संस्कार चारित्र्यसंपन्न पिढी घडविते. कुटुंबातील अनेक छोट्या-मोठ्या रूढी-परंपरा संस्कार देणाऱ्या असतात. याच संस्कारांचे प्रतिबिंब समाजात वावरताना उमटते. पण समाजमाध्यमांमुळे कुटुंबामधील घटत असलेला निकोप संवाद अनेक समस्यांचे मूळ आहे. म्हणूनच कुटुंब व्यवस्था बळकट व्हावी यासाठी भजन, भोजन, भाषा, भूषा, भवन आणि भ्रमण या उपाययोजना करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटना करीत आहेत. घरातील सर्वांनी एकत्र बसून रोज किंवा आठवड्यातून दोन वेळा तरी भोजन करावे ज्यावेळी टीव्ही, मोबाईल आदी दूर ठेवून गप्पा मारत भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे म्हटले आहे. याचा मुख्य उद्देशच निकोप संवाद व्हावा असा म्हणावा लागेल. कुटुंबात निकोप आणि निर्भय संवाद झाला असता तर कदाचित अकोल्यात आत्महत्या केलेल्या ‘त्या’ मुलीचा जीव वाचला असता.
नीलेश जोशी
9422862484