आयसीआयसीआय बँकेने २५ हजार केले दुसर्‍याच्या खात्यात वळते

पेट्रोलपंप मालक वनिता वाघमारे यांचे बँक ऐकून घेण्यासही तयार नाही

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
वर्धा,
ICICI Bank fund transfer issue वर्धा-हिंगणघाट मार्गावर धोत्रा चौरस्ता येते श्री गणेश पेट्रोलियम नावाने असलेल्या पेट्रोलपंपावर एका ट्रक चालकाने २५ हजार रुपयांचे डिझल भरले. कार्डच्या माध्यमातून पैसे देत तो निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी पेट्रोलपंप मालक वनिता सुरेश वाघमारे यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून २५ हजार रुपये दुसर्‍याच्याच खात्यात वळते करण्यात आले. मात्र, बँक अधिकारी तक्रारकर्त्याचे काहीही एक ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचा प्रकार पुढे आला आहे.
 

ICICI Bank fund transfer issue  
माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑटोबर रोजी पत्नी वनिता यांच्या नावावर असलेल्या श्रीगणेश पेट्रोलिअम येथुन एका ट्रक चालकाने २५ हजार रुपयांचे डिझल भरले. त्याने डेबिट कार्डने पैसे दिले. पेट्रोलपंपाविषयी असलेले सर्व व्यवहार आमचे स्थानिक शिवाजी चौकात असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून होतात. त्याच बँकेतून २५ हजार रुपये डेबिट झाल्याचा मॅसेज मोबाईलवर आला. आमच्यापैकी कोणीही २५ हजार रुपयांचा त्या बँकेतून परस्पर व्यवहार केला नसल्याने आम्ही सर्व अचंबित झालो. बँकेत जाऊन चौकशी केली असता आमच्या सेंट्रल बँकेतून हा व्यवहार झाल्याचे सांगण्यात आले. खोलवर चौकशी केली असता वरिष्ठ अधिकार्‍यांनी आम्ही गुजरात कोर्टाच्या आदेशाने पैसे वळते केले असल्याचे उत्तर देण्यात आले. पण, कशाच्या बदल्यात पैसे वळते करण्यात आले याचे उत्तर आजपर्यंत बँकेकडून मिळाले नव्हते. यासंदर्भात आज बँकेत प्रत्यक्ष भेटून माहिती घेतली असता डिझेल आमच्या पेट्रोलपंपावरून एकाने टाकले. दुसर्‍याने फसवणूक झाल्याची गुजरात पोलिसात तक़्रार दिली. त्यानंतर प्रकरण गुजरात न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशाने आम्ही २५ हजार रुपये दिले असल्याचे आयसीआयसीआय बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्याला सांगितले. परंतु, यात आपले समाधान झाले नसल्याची माहिती माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी दिली. आपल्या बँक खात्यातून कोर्टाच्या आदेशाने पैसे दुसर्‍याच्या खात्यात वळवत असताना कोर्ट, पोलिस वा बँकेकडून आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या घटनाक्रमात कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका आपल्याला असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही या संदर्भात वर्धेतील सायबर विभागाशी संपर्क केला असता त्यांनी या कायद्यातील त्रुटींचा आम्हालाही त्रास होत असल्याचे सायबर विभागाचे म्हणणे असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले. आम्ही गुजरात पोलिसांसोबतही संपर्क केला. परंतु, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे बँकेत जमा असलेल्या पैशांची सुरक्षा काय, असा प्रश्न आपल्याला पडला असल्याचेही सुरेश वाघमारे यांनी सांगितले.
या संदर्भात शिवाजी चौक आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक रविप्रकाश पाठक यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, हा सर्व प्रकार आमच्या सेंटर बँकेतून झाला आहे. कोर्टाच्या आदेशाने आमच्या वरिष्ठ बँकेने हा व्यवहार केला असल्याचे त्यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. माजी खासदार तडस यांनी दिलेल्या तक्रारी आम्ही वरिष्ठांकडे पाठवल्या आहेत. ते पाठपुरावा करीत असल्याचे बँक व्यवस्थापक पाठक यांनी सांगितले.