नवी दिल्ली,
Indian Army hot air balloon भारतीय सैन्याच्या केनिकल इंजिनीअर केंद्राच्या हॉट एअर बलूनिंग विभागाने भोपाळ ते पुणे या मार्गावर राबवलेली मोहिम ऐतिहासिक ठरली आहे. सुमारे ७५० किलोमीटरहून अधिक अंतर फक्त ८ तास ४४ मिनिटांत पार करून पथकाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले असून, हा प्रवास ‘एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये सर्वाधिक कालावधीच्या हॉट एअर बलून फ्लाइट म्हणून नोंदला गेला आहे.
या मोहिमेचा शुभारंभ ३० नोव्हेंबर रोजी भोपाळहून करण्यात आला, तर बुधवारी पुण्यात याचा समारोप झाला. भारतीय सैन्याच्या ॲडव्हेंचर विंगच्या अधिपत्याखाली राबवलेल्या या मोहिमेत पथकाने मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यापासून महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत विविध भूभाग पार केले. मार्गात महू, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे नियोजित थांबे घेतले गेले, जिथे पथकाने स्थानिक तरुणांशी संवाद साधून हॉट एअर बलूनिंग हा साहसी खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी दिली.
तास ४४ मिनिटांचा हा विक्रमी प्रवास पथकाच्या व्यावसायिक कौशल्य, सहनशक्ती, संघभावना आणि विमानविद्येतील उत्कृष्टतेचे अधोरेखित उदाहरण ठरला. मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांशी आणि तरुण इच्छुकांशी संवाद साधून साहस हा जीवनशैलीचा भाग कसा असू शकतो याबाबत संदेश दिला गेला. तसेच, सशस्त्र दलांविषयी माहिती देताना, प्रात्यक्षिके आणि व्याख्यांमार्फत धैर्य, शिस्त आणि एकजुटीच्या मूल्यांवर विशेष भर देण्यात आला.दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “पथकाची चिकाटी, जिद्द आणि साहसी वृत्ती प्रेरणादायी आहे. हा प्रकल्प सैन्य दलांमध्ये साहससंस्कृती अधिक दृढ करण्यास तसेच तरुणांशी संवाद साधण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरेल.”भारतीय सैन्याच्या साहसपूर्ण मोहिमेचा हा प्रवास केवळ एक शारीरिक किंवा तांत्रिक यश नाही, तर तो विद्यार्थ्यांना आणि तरुणांना धैर्य, शिस्त, एकजुटी आणि साहसी वृत्तीच्या मूल्यांशी जोडणारा अनुभव ठरला आहे.