कारंजा (घा.),
kalamohatsav कोणी काठीचा आधार घेऊन, तर कोणी सोबत्याचा हात धरून, कोणी कुबडी काखेत घेऊन तर कोणी लंगडत, कोणी आईला तर कोणी वडिलांना, कोणी मुलाला तर कोणी आयोजकांना मिळेल त्या आधाराने व्यासपीठावर चढत होते व एका मागून एक मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक कलाकार आपली कला सादर करत होते. हम भी कुछ कम नही, हे दाखवून देत २५ दिव्यांगांनी आपली कला सादर करीत कला महोत्सवात आनंद लुटला. सभागृहात भावनांचा दरवळ पसरला आणि टाळ्यांच्या गजरात प्रत्येक कलाकाराने उपस्थितांची मनं जिंकली!
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा कला महोत्सव येथील स्व. मन्नालाल मातादिन अग्रवाल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे उद्घाटन स्वाती व हरेश विजेकर या रिल स्टारच्या हस्ते कवी, गझलकार, चित्रपट सहकलाकार, निर्माता, दिग्दर्शक तसेच शब्द मराठी विश्व साहित्य संमेलनाचे संयोजक संजय सिंगलवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रेमदास मोहोड, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ हिंगवे, माहिलोन्नती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ज्योती यावले, संताजी सांस्कृतिक सेवा मंडळाचे उपाध्यक्ष सुदीप भांगे, जीएलके अपंगांची बहुउद्देशीय संस्था कारंजाचे अध्यक्ष अशोक कामडी, प्रभाकर वानखेडे, विश्वनाथ मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुयातील विविध प्रकारच्या जवळपास २५ दिव्यांगांनी त्यांच्या अंगी असलेल्या गाणी, भजन, नृत्य, कराओके गीत गायन, चित्रकला, नाट्यछटा, रांगोळी, अशा विविध कला सादर केल्या.kalamohatsav तेवढ्याच उत्साहाने सभागृहातील श्रोत्यांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा उत्साह वाढविला. प्रत्येकाने आपल्यातील दिव्यांगत्वाला बाजूला सारत प्रेक्षकांवर एक भुरळ घातली आणि आम्हीही तुमच्यापेक्षा कमी नाही याचे जीवंत असंख्यवेळा उदाहरणं २५ कलांकारांमध्ये पहायला मिळाली. प्रास्ताविक व परिचय कला महोत्सवाचे मुख्य आयोजक व कार्यक्रमाध्यक्ष कारंजा कला क्रीडा अकादमीचे विलास वानखडे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी कलाकारांना पुष्प, सन्मानचिन्ह, ग्रामगीता, सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. संचालन प्रिया काळे तर आभार प्रदर्शन प्रा. विजय खंगार यांनी केले.