तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Champaran, तामिळनाडूतील महाबलीपुरमहून बिहारमधील चंपारण येथे 210 टन वजनाचे 33 फूट उंच आणि एकाच ग्रॅनाईट दगडाचे तयार झालेले हे जगातील सर्वात उंच शिवलिंग नेण्यात येत आहे. हे शिवलिंग विराट रामायण मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. या शिवलिंगाचे गुरुवार, 11 डिसेंबर रोजी वडकी येथे आगमन झाले होते. यावेळी वडकीवासींनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
या शिवलिंगासाठी विशेष 96 टायरचा ट्रक व सुरक्षेसाठी 14 जणांचे पथक तैनात आहे, असे ट्रकचालक अरुणकुमार यांनी सांगितले. 19 नोव्हेंबरला महाबलीपुरम येथून हा प्रवास सुरू झाला असून मार्गात प्रत्येक ठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. हैदराबाद, नागपूर, जबलपूर, सतना, मिर्जापुर, छपरा असा मार्ग ठरवण्यात आलेला आहे. दररोज 60 ते 70 किमी अंतर कापले जात आहे.
आतापर्यंतच्या 22 दिवसात अंदाजे 1400 किमीचा प्रवास पूर्ण झाला असून पुढील 20 दिवसांत उर्वरित 800 किमी अंतर पूर्ण होणार आहे. काही ठिकाणी ट्रकला अडचण येऊ नये म्हणून रस्ता रुंदही करण्यात आला आहे. या शिवलिंगाची निर्मिती करण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये खर्च आला आहे. त्यासाठी अनेक महिन्यांची मेहनत लागली आहे. या भव्य शिवलिंगाच्या तळ भागात 14 ओळींमध्ये 9 इंचाची छोटी छोटी शिवलिंग आहेत. प्रत्येक ओळीमध्ये एकूण 72 शिवलिंग आहे. या सगळ्या शिवलिंगाची बेरीज केली तर ती 1008 अशी होते.हे शिवलिंग बिहारमध्ये नेणं हेच एक मोठे आव्हान ठरत आहे. 2230 किमी प्रवासाचा टप्पा पूर्ण केल्यावर बिहारमध्ये 750 टनच्या क्रेनने शिवलिंग ट्रकवरून उतरून त्याची स्थापना केली जाणार आहे. पुढच्या वर्षी विराट रामायण मंदिरात भाविकांना या शिवलिंगाचे दर्शन घेता येईल असे सांगण्यात आले.
गुरुवारी सकाळी 11 वाजता हे शिवलिंग वडकी येथे दाखल झाले. शिवलिंग दाखल होताच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनेकांनी मनोभावे शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.