तभा विशेष
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
md-mastermind : दारू आणि आता वाळू पकडण्यासाठी कायम आघाडीवर असलेल्या पोलिसांना कारंजात सुरू असलेला मादक पदार्थ बनवण्याचा कारखाना माहिती नसणे हे पोलिस प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल. या प्रकरणाचे बींग फुटल्यानंतर मेफेड्रोन बनवणाèया त्रिकुटातील अग्रवाल नामक तरुणाच्या रंजक कथा तरुण भारतच्या हाती लागल्या आहेत.
नागपुरात एका बँकेत नोकरीवर असताना त्याने प्रत्येक खातेदाराच्या खात्यातून प्रत्येकी 1 रुपया काढला होता. हा प्रकार बँक व्यवस्थापकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला. संगणकीयदृष्ट्या अतिशय तरबेज असलेला अग्रवाल स्वत:च्या घरी मोठ्या स्क्रीनवर कोणाच्या खात्यात किती पैसे आहेत, हे पाहू शकत होता. एवढेच नव्हे तर, त्याने कारंजातील एका राष्ट्रीयकृत बँकेला हॅक करून दिवसभरासाठी व्यवहार बंद ठेवले होते, अशी कारंजात चर्चा आहे.
या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु, यात कोणताही आर्थिक घोटाळा झाला नसल्याने त्याच्यावर कारवाई झाली नाही. याशिवाय, एका नामांकीत कंपनीचे मोबाईल टॉवरही त्याने गंमतीगंमतीत दिवसभरासाठी बंद करून पाहिले होते. त्याला फेसबुक, इन्स्टाग्राम आदीचेही संपूर्ण ज्ञान असल्याचे गावातील युवकांनी सांगितले. कोणाचेही फेसबुक आयडी हॅक झाल्यानंतर तो लिलया त्यातून बाहेर काढून देत होता. जुने फेसबुक अकाऊंट शोधणे ही त्याच्या डाव्या हाताची करामत असल्याचेही बोलल्या जात आहे तसेच परस्पर कोणाच्याही खात्यातून पैसे काढण्याची तक्रार पोलिसांकडे आल्यास पोलिसही त्याची मदत घेत होते, असे सांगितल्या जात आहे.
कारंजातील गोकुल सिटी येथे त्याने एका भुखंडावर व्यवसाय सुरू केला. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीचे तसेच केमिकल प्रॉडक्ट तयार करण्याचे काम करीत असल्याचे त्याने सांगितले होते. संगणक, मोबाईलचा बादशहा असलेला अग्रवाल मात्र समाजमाध्यमांपासून दूर होता. त्याचे फेसबुक वा अन्य कोणत्याही समाजमाध्यमावर फोटो अपलोड नाहीत, हे उल्लेखनंय!
कारंजात झाला नाही, असा होणार होता वाढदिवस
येत्या काही दिवसांत त्याच्या घरी कुटुंबातील सदस्याच्या वाढदिवसाचे नियोजन त्याने सुरू केले होते. शहरात आजपर्यंत झाला नाही, असा वाढदिवस साजरा करण्याचा मनसुबा त्याने बोलून दाखवला होता. वाढदिवसाला तो महागडी कार घेणार होता. त्याने कारही बुक करून ठेवली असल्याची चर्चा कारंजा गावात आहे.