अमेरिकन संसदेत मोदी–पुतिनच्या फोटोने खळबळ

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
वॉशिंग्टन,
Modi-Putin photo in the American Parliament अमेरिकन कॉंग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान घेतलेल्या ‘सेल्फी’चा दाखला देत प्रतिनिधी सिडनी कमलागर-डोव्ह यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका केली. भारतीय पंतप्रधान आणि रशियन राष्ट्राध्यक्ष एकत्र दिसणारा हा फोटो दाखवत त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांच्या भारताबाबतच्या धोरणांमुळे अमेरिकेचीच हानी होत आहे. भागीदारीला जबरदस्तीचा रंग दिला की त्याची किंमत मोजावीच लागते. मोदी आणि पुतिन यांचा हा फोटो हजार शब्द बोलतो, असे म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनावर सवाल उपस्थित केला.
 
Modi-Putin photo
 
 
डोव्ह यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या महत्त्वाच्या भागीदारांना त्यांच्या शत्रूंच्या दिशेने ढकलणे म्हणजे कूटनीती नसून धोक्याचे पाऊल आहे. “अशा पद्धतीने वागून ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नाही. उलट, या प्रशासनाने अमेरिका–भारत भागीदारीला झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई करावी आणि दोन्ही देशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सहकार्य पुन्हा मजबूत करावे,” असे त्यांनी अधोरेखित केले. त्या हाऊस फॉरेन अफेयर्स कमिटीच्या दक्षिण आणि मध्य आशिया उपसमितीच्या ‘अमेरिका–भारत धोरणात्मक भागीदारी: मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिक’ या विषयावरील सुनावणीत बोलत होत्या.
 
 
आपले वक्तव्य पुढे विस्तारताना डोव्ह म्हणाल्या की, ट्रम्प यांनी पदभार स्वीकारला तेव्हा बायडेन प्रशासनाने भारताशी संबंध ऐतिहासिक उंचीवर नेले होते. “हे यश कठोर प्रयत्नांनी मिळवले होते, पण ट्रम्प यांनी वैयक्तिक तक्रारी पूर्ण करण्यासाठी अमेरिकेच्या दीर्घकालीन हितांचीच आहुती दिली. दशके घालून उभे राहिलेले भांडवल काही महिन्यांत नष्ट झाले,”असे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी भूमिका न बदलल्यास भारताशी द्विपक्षीय संबंध पुनर्संचयित होणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. “इतिहासात त्यांची नोंद अशा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून होईल, ज्यांनी भारताला दूर ढकलले, रशियन वर्चस्वाला हवा दिली, ट्रान्सअटलांटिक युती ढासळवली आणि लॅटिन अमेरिकेत अस्थिरता निर्माण केली, असे कठोर शब्दांत त्यांनी ट्रम्प यांच्यावर बोट ठेवले.
त्यांच्या मते, ट्रम्प यांच्या भारतावरील धोरणांची मूळ प्रेरणा राष्ट्रीय हित नव्हे, तर नोबेल शांतता पुरस्काराबद्दलचा त्यांचा वैयक्तिक ध्यास आहे आणि हे हास्यास्पद असले, तरी त्यातून होणारे नुकसान फार गंभीर आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावर ५०% आयातकर लावल्याचा उल्लेख करत कमलागर-डोव्ह म्हणाल्या की, हा अमेरिकेने कोणत्याही देशावर लादलेल्या सर्वात जास्त करांपैकी एक आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांच्या नेतृत्व स्तरावरील संवादात अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर, भारताच्या नावाने रशियन तेल आयातीवर २५% कर लादणेही अव्यवहार्य असल्याचे त्या म्हणाल्या.