महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला?

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Municipal elections in Maharashtra विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं देणाऱ्या महायुतीने आता लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे वळवले आहे. याच दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपुर या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत, तर नवी मुंबईबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत मात्र राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीनं युतीसाठी रणनिती आखली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
 

Municipal elections 
 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाची नुकतीच बैठक पार पडली, ज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही हजेरी होती. साधारण चार ते साडेचार तासांच्या या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या सूत्रांवर सखोल चर्चा झाल्याचे सांगितले जाते. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद लक्षात घेऊन नवी मुंबईबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, उर्वरित मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपूरबाबत युतीत एकमत झाले असून, या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत.
 
 
नागपूरमध्ये भाजपची पकड मजबूत असूनही, शिवसेनेला सोबत घेऊनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. काही अपवादात्मक जागा वगळता उर्वरित सर्व ठिकाणी महायुतीत सहमती झाल्याचे दिसून येते. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री आमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. तर, महाविकास आघडी किंवा इतर सहयोगी पक्षांसोबत युती करावी, मात्र भाजप, शिंदे सेना किंवा दादांची राष्ट्रवादी यांच्यासोबत युती करू नये, असे उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. येत्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका जोमाने लढवायच्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, राज्यातील धनशक्तीला जनशक्ती आणि श्रमशक्तीने उत्तर द्यायचे आहे, आणि पक्षातील सदस्य या तयारीत तत्पर राहावेत. आता ठाकरे बंधू कोणत्या युतीत निवडणूक लढवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.