नवजोत कौर यांचा 500 कोटीच्या आरोपाचा बॉम्ब

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
 
दिल्ली वार्तापत्र
 
navjot kaurs काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मतचोरीच्या मुद्यावरुन भाजप आणि निवडणूक आयोगावर सातत्याने आरोप करत असतांना त्यांच्या पक्षाच्या पंजाबमधील एका नेत्याने काँग्रेस नेतृत्वावर आरोप करत खळबळ उडवली. पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले नवज्योतसिंग सिध्दू यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या नवजोत कौर यांनी हा आरोप केला. नवज्योतसिंग सिध्दू पंजाबच्या राजकारणात कधी परतणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, काँग्रेस पक्ष त्यांना मुख्यमंत्रिपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर करेल, तेव्हाच ते राजकारणात परततील, असे उत्तर नवजोत कौर यांनी दिले. मात्र त्या एवढ्यावरच थांबल्या नाही, तर पंजाबचा मुख्यमंत्री होण्यासाठी 500 कोटी रुपयांची सुटकेस पाहिजे, अशी सुटकेस दिल्याशिवाय काँग्रेस पक्षात कोणतेच पद मिळू शकत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. आम्हाला काँग्रेस पक्षातून कोणी पैसे मागितले नाही, मात्र जो 500 कोटी रुपये देऊ शकतो, तोच काँग्रेसकडून पंजाबचा मुख्यमंत्री होऊ शकतो, मात्र आमच्याजवळ एवढे पैसे नाही, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असा खुलासाही त्यांनी केला. या आरोपामुळे पंजाब प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे.
 
 

नवजोत कोर  
 
 
विशेष म्हणजे 2027 मध्ये पंजाब विधानसभेची निवडणूक असल्यामुळे नवजोत कौर यांच्या आरोपांना राजकीय महत्व प्राप्त झाले. दुसरे म्हणजे पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची भेट घेऊन आल्यानंतर नवजोत कौर यांनी हा आरोप केला, त्यामुळे त्याचे गांभीर्य आणखी वाढले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेकांवर दुसरा एफआयआर दाखल झालेला असतांना नवजोत कौर यांनी असा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वाला घरचा अहेर करत आरसा दाखवला, असे म्हणायला हरकत नाही. .
नवजोत कौर यांच्या या आरोपानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. निलंबनाची कारवाई केल्याबद्दल नवजोत कौर यांनी पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वडिंग यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करत हल्ला चढवला. नवज्योत कौर यांच्या निलंबनावर, त्यांना कॉर्ग्रेस पक्षात खरे बोलण्याची शिक्षा मिळाली, अशी बोचरी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते शहजाद हुसेन यांनी व्यक्त केली. नवजोत कौर यांनी नाव घेऊन हा आरोप केला नसला तरी काँग्रेस काँग्रेसच्या नेतृत्वाला आणि एकूणच काँग्रेसची संस्कृती आणि कार्यपध्दतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, असे म्हणावे लागेल. एकप्रकारे काँग्रेस पक्षातील संस्थात्मक भ्रष्टाचाराचे पितळ त्यांनी उघडे पाडले. काँग्रेस पक्षातील नेते आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, यात शंका नाही. काँग्रेसमध्ये पदांचा बाजार चालतो, पैसे घेऊन पदे विकली जातात, असा आरोप याआधी अनेकांनी केला आहे, त्या आरोपाला नवजोत कौर यांच्या ताज्या विधानामुळे एकप्रकारे दुजोरा मिळाला आहे. विशेष म्हणजे पंजाबच्या राजकारणात नवज्योतसिंग सिध्दू आणि त्यांच्या पत्नी नवजोत कौर यांचे वेगळे मह्त्व आहे. त्यामुळे त्यांचे आरोप उडवून लावता येणार नाही. नवजोत कौर यांचे आरोप पंजाबमधील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाबाबत असले तरी काँग्रेस पक्षाची एकूणच संस्कृती पाहता त्याची व्याप्ती राष्ट्रीय स्वरुपाची राहू शकते. नवज्योत कौर यांच्या आरोपानंतर काँग्रेस पक्षावर तुटून पडण्याची आप आणि भाजपाला आयती संधीच मिळाली.
पंजाबमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे, त्यामुळे या आरोपांचे गंभीर पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. पंजाबसारख्या तुलनेत छोट्या राज्यात मुख्यमंत्रिपद 500 कोटी रुपयांत विकले जात असेल तर अन्य मोठ्या राज्यात विशेषत: कर्नाटकमध्ये त्या पदाची किंमत किती असेल, अशी चर्चा सुरु होणे स्वाभाविक आहे. काँग्रेसशासित अन्य एका राज्यात मुख्यमंत्रिपदाची किंमत 350 कोटी रुपये असल्याचा आरोप एका भाजपा नेत्याने केला आहे.navjot kaurs नवज्योतसिंग सिध्दू यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 2004 ची निवडणूक त्यांनी भाजपाच्या तिकिटावर अमृतसरमधून लढवली आणि जिंकली. राजकारणात येण्याच्या आधी सिध्द भारताच्या कसोटी क्रिकेट संघात होते. 1988 मध्ये सिध्दू आपल्या एका मित्रासह पातियाळाच्या बाजारात गेले असता, तेथे गाडीच्या पार्किगवरुन त्यांचा एका व्यक्तीशी वाद झाला, यात वादात सिध्दू यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्या व्यक्तीचे नंतर रुग्णालयात निधन झाले. सिध्दू खासदार झाल्यानंतर हा खटला पुन्हा सुरु करण्यात आला. सदोष मनुष्यवधाच्या या प्रकरणात न्यायालयाने त्यांना सत्र न्यायालयाने तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम केली. तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे सिध्दू यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला. सिध्दू यांनी या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कमी करत एक वर्षावर आणली. एवढेच नाही तर त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. 2007 मध्ये अमृतसरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सिध्दू विजयी झाले. 2009 मध्ये सिध्दू पुन्हा अमृतसरमधून भाजपाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. 2016 मध्ये सिध्दू यांनी भाजपाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपण जन्मजात काँग्रेसी असल्याचा दावा त्यांनी तेव्हा केला होता. पंजाबमधील काँग्रेसच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. 2021 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांची प्रदेश काँग्रेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. 2020 ची पंजाब विधानसभेची निवडणूक काँग्रेसने सिध्द यांच्या नेतृत्वात लढवली. या निवडणुकीत सिध्दू यांचा तर पराभव झाला, पण राज्यात काँग्रेसचेही पानीपत झाले.त्यामुळे सिध्दू यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून ते राजकारणातून दूर फेकल्या गेले.navjot kaurs कपील शर्माच्या लॉफ्टर शोमध्ये ते गेल्या काही वर्षापासून परीक्षक म्हणून काम करत टाईमपास करत आहे. पत्नी नवजोत कौर यांच्या 500 कोटीच्या आरोपामुळे सिध्दू पंजाबच्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाले आहे. त्यांच्या पत्नी नवजोत कौर 2012 मध्ये अमृतसर पूर्व विधानसभा मतादरसंघातून काँगेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक जिंकल्या. पक्षाच्या सांसदीय सचिव म्हणून त्यांनी काम केल्या. त्यामुळे नवजोत कौर यांचा आरोप दुर्लक्ष करण्यासारखा नाही. कौर यांच्या आरोपामुळे पंजाबमध्ये काँग्रेसतर्फे आतापर्यंत जे मुख्यमंत्री झाले, त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला 500 कोटी रुपयांची सुटकेस पोहोचवली होती, अशी शंका घायला जागा आहे. तसे झाले असेल तर कौर यांनी आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ याचे भक्कम पुरावे द्यायला पाहिजे. काँग्रेसच्या नेतृत्वानेही त्यांच्या आरोपांची चौकशी करत आपले ‘हात’ भ्रष्टाचाराने बरबटलेले नाही, हे सिध्द केले पाहिजे. अन्यथा नवजोत कौर यांच्या आरोपात निश्चितच तथ्य आहे, असे पंजाबच्या जनतेला वाटेल.
श्यामकांत जहागीरदार
9881717817