खैबर पख्तूनख्वा,
Poster of Asim Munir खैबर पख्तूनख्वा विधानसभेत पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नावावरून जोरदार गोंधळ उडाला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतावर विजय मिळवला, असा दावा करत पाकिस्तानने असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पद दिले असून घटनादुरुस्ती करून त्यांना संरक्षण प्रमुखाचा दर्जाही प्रदान केला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पाकिस्तानने भारताविरुद्धचा पराभव झाकण्यासाठी आणि लोकांचा लष्कर व सरकारवरील विश्वास टिकवण्यासाठी अशी पावले उचलली. मात्र, इम्रान खान यांच्या पक्षाशी लष्कराचा संघर्ष कायम आहे.
गुरुवारी विधानसभेत पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या आमदार सोबिया शाहिद यांनी फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या पोस्टर्स लावल्याने वाद उफाळला. सभापती सुरैया बीबी यांनी तात्काळ पोस्टर्स हटवण्याचे आदेश दिले आणि संरक्षण प्रमुखांचा वापर पक्षीय फायद्यासाठी करू नये, अशी समज देत तुमच्या कार्याबद्दल बोला, संरक्षण प्रमुखांचे फोटो का लाटता? अशी टिप्पणी केली.
दरम्यान, पीटीआयच्या आमदारांनी महागाई, आर्थिक संकट आणि राजकीय अस्थिरता यांसारख्या गंभीर समस्या असतानाही, लष्कराचे प्रवक्ते ले. जनरल अहमद शरीफ चौधरी हे सतत इम्रान खान आणि मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांच्याविरोधात वक्तव्ये करत असल्याचा आरोप केला. या वक्तव्यांमुळे खैबर पख्तूनख्वा जनतेत नाराजी वाढली आहे. पीटीआय आमदार हुमायून खान यांनी लष्कर राजकीय विषयांमध्ये का बोलते, असा सवाल उपस्थित केला. तसेच काही गट राष्ट्रपती राजवटीची मागणी करत असल्याचे सांगून, अशी स्थिती निर्माण झाली तर खैबर पख्तूनख्वात गंभीर अस्थिरता येऊ शकते आणि जनता ती कदापिही स्वीकारणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.