सॅन फ्रान्सिस्को,
San Francisco Waymo सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ड्रायव्हरलेस वेमो रोबोट टॅक्सीने अप्रतिम कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसूतीवेदना सुरू झाल्याने रुग्णालयाकडे निघालेली एक गर्भवती महिला प्रवासादरम्यानच गाडीत बाळंतपणाला आली. या घटनेनंतर वेमोच्या स्वयंचलित प्रणालीने परिस्थितीला त्वरित आपत्कालीन प्रसंग म्हणून ओळखले आणि कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय गाडीने थेट रुग्णालय गाठले. या निर्णयक्षम प्रतिक्रियेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वेमोची ड्रायव्हरलेस वाहने अनेकदा चुकांमुळे चर्चेत येत असतात.कधी एखाद्या प्राण्याला धडक देणे, तर कधी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे. मात्र, या घटनेने कंपनीची प्रतिमा बदलण्यास मदत केली आहे. सोमवारच्या या प्रसंगात वेमोच्या रायडर सपोर्ट टीमला गाडीत ‘अनियमित हालचाल’ दिसताच त्यांनी त्वरित महिलेचा संपर्क साधला आणि 911 ला कळवले. वेमोने त्यांच्या वाहनांतील कॅमेरे आणि मायक्रोफोनसारख्या संवेदन प्रणालींमुळे परिस्थिती कशी ओळखली याबाबत तपशील न दिला असला, तरी गाडीने आपत्कालीन सेवांना थांबविण्याऐवजी महिले आणि नवजात बाळाला UCSF वैद्यकीय केंद्रात सुरक्षित पोहोचवल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयाच्या प्रवक्त्याच्या मते आई आणि बाळ दोघेही पूर्णपणे निरोगी असून उपचारानंतर स्थिर आहेत.
घटनेनंतर वाहन तत्काळ सेवेतून काढून निर्जंतुक करण्यात आले. वेमोने या प्रसंगावर प्रतिक्रिया देताना सांगितले की अशा ‘जीवनातील खास क्षणी’ त्यांनी मदत करणे हे पहिल्यांदाच नाही आणि सर्व वयोगटातील प्रवाशांसाठी विश्वासार्ह सेवा देण्याचा त्यांना अभिमान आहे. ड्रायव्हरलेस टॅक्सींबाबत वाद असले तरी सॅन फ्रान्सिस्को, सिलिकॉन व्हॅली, लॉस एंजेलिस आणि फिनिक्ससह अनेक भागांत या सेवा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका वेमो टॅक्सीने ‘नो यू-टर्न’ चिन्हासमोर बेकायदेशीर वळण घेतल्याचा प्रसंग गाजला होता, मात्र ताज्या घटनेने वेमोच्या तंत्रज्ञानाची एक वेगळी आणि मानवी बाजू समोर आणली आहे.