पुणे,
Severe cold in Vidarbha महाराष्ट्राच्या अनेक भागात थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तापमान सध्या ६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभर थंडीची लाट पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मध्य भारत आणि उत्तर भारतातील कोल्ड वेव्हची स्थिती कायम राहणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांवर दिसून येईल.

पुण्यातील थंडीचे अद्ययावत आकडे पाहता, शहराचे तापमान सध्या ८.१ अंश सेल्सिअसवर आले आहे, जे यंदा हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. शिवाजी नगरमध्ये तापमान ८.९ अंश, तर पाषाणमध्ये ८.४ अंश सेल्सिअस इतके आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि निफाडमध्येही थंडीची लाट कायम आहे. निफाडचे तापमान ६.१ अंश, तर नाशिकचे ८.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. हवामान विभागानुसार, पुढील दोन ते तीन दिवस या भागातील थंडी कायम राहणार आहे. विदर्भातील नागपुरात आज मोसमातील दुसऱ्या निचांकी तापमानाची नोंद झाली असून ते ८.१ अंश सेल्सिअस आहे. काल नागपुरात ८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते, जे हंगामातील सर्वात कमी होते. भंडाऱ्यात किमान तापमान १२ अंश, बुलढाण्यात १२.२ अंश, गोंदियामध्ये ८.४ अंश आणि परभणीत ५.५ अंश सेल्सिअस इतके आहेत.
कोकणात मिनी महाबळेश्वर गारठले असून दापोलीमध्येही थंडीची लाट पसरली आहे. तापमान सात अंश सेल्सिअसवर आहे. उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर आणि खेडमध्ये प्रचंड थंडी जाणवली असून नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. अहिल्यानगरमध्ये तापमान ७.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. हवामान विभागाने पुढील अंदाजानुसार सांगितले आहे की राज्यातील किमान तापमान आणखी खाली जाऊ शकते. मध्य महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, तर त्यानंतर लगेच तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता देखील आहे.