सिंदीत सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
सिंदी (रेल्वे), 
cci-cotton-procurement-center : स्थानिक बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या मागणीला प्रतिसाद मिळाला असून उद्या शुक्रवार १२ रोजीपासून स्थानिक वासुदेव जिनिंग प्रेसिंगच्या आवारात कापूस खरेदी सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली.
 

JK 
 
मागीलवर्षी सीसीआयने सिंदी येथे खरेदी सुरू न केल्यामुळे तसेच सेलू उपबाजारातही फत एकच केंद्र सुरू केल्याने शेतकर्‍यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला होता. सिंदी, सेलू तसेच आजूबाजूच्या गावातील शेतकर्‍यांचा कापूस कांढळी, समुद्रपूर, चिमनाझरी आणि नागपूर येथे विकावा लागला होता. या पृष्ठभूमीवर सिंदी बाजार समितीने महाप्रबंधक, सीसीआय अकोला यांच्याकडे सलग पाठपुरावा केला. त्याशिवाय शेतकर्‍यांनीही सामूहिक निवेदनाद्वारे सिंदी व सेलडोह या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. खा. अमर काळे, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आ. समीर कुणावार यांच्याकडेही दाद मागितली.
 
 
बाजार समितीचे सभापती के. बा. खंगारे व संचालक, सचिव महेंद्र भांडारकर यांच्या सातत्यपूर्ण मागणीला आता यश आले. समितीने दिलेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांनी कापूस विक्रीकरिता स्लॉट बुक करणे आवश्यक असून अडचणी आल्यास बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सभापती खंगारे यांनी केले आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक खर्चात बचत होणार आहे. सिंदी,‡सेलू परिसरात कापूस हंगाम सुरळीत पार पडण्यास ही महत्त्वाची पावले ठरणार आहेत.