पुलगाव,
Pulgaon bus stand : पुलगाव-देवळी मार्गावर असलेल्या केळापूर-दहेगाव, दहेगाव स्टेशनवर एसटी बसेस न थांबवता वेगाने नेल्या जात असल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आज गुरुवार ११ रोजी पुलगाव आगारातच एल्गार पुकारला. आपल्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणार्या आगार व्यवस्थापकांचा निषेध करत विद्यार्थ्यांनी थेट बस स्थानकावरच ‘बस रोको’ आंदोलन केले. तब्बल एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे स्थानकावर बसेसच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिस प्रशासनाची मध्यस्थी आणि आगार व्यवस्थापकांकडून लेखी निवेदन मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

केळापूर व दहेगाव, दहेगाव स्टेशन परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज पुलगाव येथे येतात. विद्यार्थी नियमानुसार एसटी महामंडळाचे पासेस काढून प्रवास करतात. मात्र, पुलगाव आगारातील काही चालक-वाहक या विद्यार्थ्यांच्या थांब्यावर बस थांबवत नाहीत. विद्यार्थ्यांनी हात दाखवत विनंती केली असता बसचा वेग वाढवून ती अंगावर घालण्याचा किंवा कट मारून नेण्याचा जीवघेणा प्रकार चालकांकडून केला जातो. येथे बस थांबत नसल्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांची शाळा बुडते आणि त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असते. या गंभीर प्रकाराबाबत विद्यार्थ्यांनी यापूर्वीच आगार व्यवस्थापक बोबडे यांना पुराव्यासह तक्रार केली होती. बस न थांबवता निघून जाणार्या गाड्यांचे व्हिडिओ आणि क्रमांक व्यवस्थापकांना पाठवूनही संबंधित चालक-वाहकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. बस चालकांवर वरिष्ठांचा कोणताही धाक उरला नसल्याने त्यांची मनमानी सुरूच असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी निवेदनात केला आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराला कंटाळून आज ११ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यार्थ्यांनी थेट पुलगाव बसस्थानक गाठले. विद्यार्थ्यांनीं हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन बसच्या समोर ठिय्या मांडला. जोपर्यंत आगार व्यवस्थापक स्वतः येऊन लेखी आश्वासन देत नाहीत आणि संबंधित मुजोर बस चालकांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत बसेस हलू देणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात मध्यस्थी केली. अखेर आगार व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.