नागपूर,
Uddhav Thackeray criticism, महायुतीच्या नेत्यांमध्ये कुठलाही पायपोस राहिलेला नाही. दररोज एकमेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. तसेच मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी दिसून येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणतीही कारवाई करीत नाही. मुख्यमंत्र्यांनी आता एक पांघरूण खाते तयार करावे, म्हणजे इतर मंत्री पांघरूण बघून हात पाय या खात्याचा चार्ज मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असा टोला माजी मुख्यमंत्री व शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधीमंडळाच्या कामकाजात भाग घेण्यासाठी पोहचल्यानंतर पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांच्यासह अनिल परब, सुनील प्रभू, सुषमा अंधारे, मिलिंद नार्वेकर, सचिन अहिर उपस्थित होते.विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असताना विरोधी पक्षाची निवड अद्याप झालेली नाही. विरोधी पक्ष पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव दिल्यानंतर अद्याप आम्हाला कोणतेही उत्तर मिळालेले नाही. आमच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी सरकार घाबरत आहे का? हा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी केला. केंद्र आशीर्वाद असताना विरोधी पक्षनेते पद देण्यासाठी घाबरण्याची गरज काय ? मुख्यत: विरोधी पक्ष नेतेपदासाठी नियम लावणार असाल, तर उपमुख्यमंत्रीपद देखील संवैधानिक आहे. तेही सुध्दा रद्द करा, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली.
शेतकर्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष
प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते निवडण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे की मुख्यमंत्र्यांना ही लोकशाहीची मांडणी या गोष्टी उगाचंच फिरवून ठेवल्या जात आहेत. अध्यक्षांबाबतची आमची मते आम्ही गेल्या टर्ममध्ये व्यक्त केलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी याचा जाब विचारला पाहिजे. शेतकर्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येते. आतापर्यंत निवडणूकीच्या प्रचारात हे सरकार व्यस्त होते. यानंतर पुन्हा जिल्हा परिषद, मनपा निवडणूकीच्या सरकार व्यस्त होणार आहे. एक निवडणूक संपली की दुसर्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महत्वाच्या प्रश्नांकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.