वॉशिंग्टन
US-Venezuela tensions अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव चिघळत असून परिस्थिती युद्धसदृश बनत चालली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचा एक मोठा तेल टँकर जप्त केल्याची घोषणा केल्यानंतर काराकसमध्ये संताप उसळला. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया देत अमेरिका आपल्या राष्ट्राच्या संसाधनांवर डल्ला मारत असेल तर त्याचे दात तोडू, असा इशारा दिला. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळील हा टँकर अत्यंत “योग्य कारणांसाठी” जप्त करण्यात आला आहे, मात्र त्यांनी तपशील देण्यास नकार दिला. एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की ही कारवाई पूर्णपणे अमेरिकन कायदा अंमलबजावणीच्या अधिकाराखाली केली गेली. यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड या विमानवाहू जहाजावरून हेलिकॉप्टरद्वारे तटरक्षक दलाचे जवान टँकरवर उतरले आणि जहाजाचा ताबा घेतला. कॅरिबियन समुद्रात अमेरिकेने अलीकडेच केलेल्या मोठ्या शक्तीप्रदर्शनाचा हा भाग असल्याचेही सांगितले जाते.

अमेरिकेच्या अटर्नी जनरल पाम बोंडी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये ऑपरेशनदरम्यान हेलिकॉप्टर डेकच्या जवळ फिरताना, तसेच शस्त्रधारी जवान जहाजावर हालचाल करताना दिसतात. बोंडी यांनी दावा केला की हा टँकर परदेशी दहशतवादी संघटनांना मदत करणाऱ्या बेकायदेशीर तेल तस्करी नेटवर्कचा भाग होता आणि अमेरिकेने त्याच्यावर अनेक वर्षांपासून निर्बंध लादले होते. व्हेनेझुएलाने या कारवाईला आंतरराष्ट्रीय चाचेगिरी म्हणत तीव्र निषेध नोंदवला. सरकारी निवेदनात म्हटले आहे की अमेरिका नेहमीच व्हेनेझुएलाच्या नैसर्गिक संपत्तीवर, विशेषतः तेलसंपत्तीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आणि ही जप्ती त्याचेच प्रकट रूप आहे. जप्त केलेल्या टँकरची ओळख ‘स्किपर’ अशी करण्यात आली असून तो डिसेंबरच्या सुरुवातीला सुमारे २० लाख बॅरल जड कच्चे तेल घेऊन व्हेनेझुएलातून निघाल्याचे दस्तऐवज सांगतात. या मालामध्ये जवळपास अर्धा वाटा क्युबाच्या राज्यसंस्थेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेच जहाज पूर्वी एम/टी एडिसा या नावाने ओळखले जात असे आणि इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड व हिजबुल्लाहशी संबंधित शॅडो टँकर नेटवर्कमध्ये काम करत असल्याच्या आरोपावरून २०२२ मध्ये अमेरिकेने त्याच्यावर निर्बंध लादले होते. जगातील सर्वात मोठ्या सिद्ध तेलसाठ्यांचा मालक असलेल्या व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पीडीव्हीएसए या सरकारी तेल कंपनीवर प्रामुख्याने अवलंबून आहे. मात्र २०२० मध्ये ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या कठोर निर्बंधांनंतर व्हेनेझुएलाला विविध मध्यस्थ आणि मित्रदेशांवर विशेषतः रशिया आणि इराणवर—अवलंबून राहावे लागत आहे. या व्यवहारांमध्ये अनेक शेल कंपन्या आणि गुप्त नेटवर्कांचा समावेश असतो, ज्याद्वारे निर्बंध चुकवण्याचे प्रयत्न केले जातात. ताज्या जप्तीनंतर परिस्थिती किती तीव्र रूप घेईल हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल, परंतु दोन्ही देशांतील राजनैतिक तणाव आता धोकादायक वळणावर पोहोचल्याचे संकेत दिसत आहेत.