बलुचिस्तानच्या खाण मिळाल्याने अमेरिका पाकला देणार एफ-१६ तंत्रज्ञान

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
वॉशिंग्टन,
US will provide F-16 technology to Pak अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बलुचिस्तानमधील खाणींवर नियंत्रण मिळाल्यानंतर पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याबद्दलचा कल वाढताना दिसत आहे. बलुचिस्तानातील सोने, चांदी आणि इतर मौल्यवान खनिजांवरील अमेरिकेचा प्रभाव वाढल्यानंतर वॉशिंग्टनने पाकिस्तानवर उदारतेचा वर्षाव सुरू केला आहे. याच अनुषंगाने, अमेरिकेने पाकिस्तानला एफ–१६ लढाऊ विमानांसाठी प्रगत तंत्रज्ञान, दुरुस्ती, प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्यास मंजुरी दिली असून या कराराची किंमत तब्बल ६८६ दशलक्ष डॉलर्स आहे.
 
 

US will provide F-16 technology to Pak 
संग्रहित फोटो 
 
एका माहितीनुसार, यूएस डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने (डीएससीए) काँग्रेसला पाठवलेल्या पत्रातून या निर्णयाची औपचारिक पुष्टी केली. विशेष म्हणजे, याच्या केवळ एक दिवस आधी अमेरिका बलुचिस्तानमध्ये खाणकामासाठी १.२५ अब्ज डॉलर्सचे गुंतवणूक पॅकेज जाहीर केले होते. या नव्या संरक्षण करारात लिंक–१६ कम्युनिकेशन सिस्टम, आधुनिक क्रिप्टोग्राफिक उपकरणे, एव्हियोनिक्स अपग्रेड आणि विस्तृत प्रशिक्षणसह सर्वसमावेशक तांत्रिक सहाय्याचा समावेश आहे. डीएससीएने स्पष्ट केले आहे की ही मदत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी सुसंगत आहे आणि पाकिस्तानला दहशतवादविरोधी मोहिमा तसेच भविष्यातील तातडीच्या सैनिकी कारवायांसाठी अधिक सक्षम बनवेल.
 
एफ–१६ ताफ्याचे आधुनिकीकरण हे या निर्णयाचे प्रमुख उद्दिष्ट असून ब्लॉक–५२ आणि मिड–लाइफ अपग्रेड विमानांना २०४० पर्यंत उड्डाणक्षम ठेवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी आणि अमेरिकन हवाई दलातील संयुक्त सराव व लढाऊ मोहिमांमध्ये अधिक सुसंवाद आणि परस्पर कार्यक्षमता निर्माण होईल, असे पत्रात नमूद केले आहे. पाकिस्तानने आवश्यक तांत्रिक साधनांचे आत्मसात करण्याची क्षमता आणि तयारी दाखवली असल्याचा उल्लेखही अमेरिकेने केला आहे. तसेच या करारामुळे प्रादेशिक लष्करी संतुलन बिघडणार नाही, असा दावा अमेरिकेने स्पष्टपणे नोंदवला आहे. एकूण ६८६ दशलक्ष डॉलर्सच्या या करारापैकी ३७ दशलक्ष डॉलर्स हे मुख्य लष्करी उपकरणांसाठी असून, उर्वरित ६४९ दशलक्ष डॉलर्स तांत्रिक सेवा आणि सहाय्यासाठी निर्धारित आहेत. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, ही विक्री त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असून पाकिस्तानलाही त्यांचा एफ–१६ ताफा सुरक्षित आणि कार्यक्षमपणे उड्डाणासाठी तयार ठेवण्यात मदत करणार आहे.