वर्धा,
anup-kumar : महिला बाल विकास विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनुपकुमार यादव यांनी आज जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यात सेवाग्राम विकास आराखड्यासह विविध विभागांची सुरू असलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद राजूरवार, आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी जिल्हा वार्षिक योजना व जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत विविध योजनांचा आढावा सादर केला.
जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा आढावा घेताना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर कामे तातडीने सुरू करावी. विभागांना प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च होण्यासोबतच मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सेवाग्राम विकास आराखड्यांंतर्गत अनेक कामे सुरू आहेत. सुरू असलेली आणि सुरूच न झालेल्या कामांना गती देण्यात यावी. आराखड्यातील कामातून महात्मा गांधी यांचे जिवन दर्शन घडणार असल्याने कामे लवकर होण्यासोबतच गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी त्यांनी पायाभूत सुविधेची मोठी व त्यासंबंधीची कामे, जिल्हा विकास आराखडा, अॅग्रीस्टॅक प्रकल्प, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत वाटप, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना, भारत व महानेट प्रकल्प, महासंपत्ती प्रणाली, आकांक्षित तालुका उपक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व लस्टर डेव्हलपमेंट, बालविकास प्रकल्प कार्यक्रम, जिल्ह्यात नव्याने मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शक्तीपीठ महामार्ग, नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, घरकुल, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, स्वच्छता भारत मिशन, जलयुक्त शिवार, जनजीवन मिशन आदी विविध विषयांचा आढावा घेतला.