कारंजा (घा.),
md-drugs-illegal-factory : येथील गोकुल सिटी परिसरात सुरू असलेल्या एमडी ड्रग्स निर्मितीच्या अवैध कारखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली. याच ड्रग्स निर्मितीच्या कारखान्याची नागपूर विभागाचे पोलिस महासंचालक संदीप पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक पोलिसांना काही मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी पोलिस अधीक्षक अनुराग जैन व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

पोलिस महासंचालक संदीप पाटील यांनी प्रकरणाबाबत माहिती जाणून घेत स्थानिक गुन्हे अन्वेेशन विभागाच्या विशेष पथकाला आर्वी उपविभागातील सर्व परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. कारंजा सारख्या छोट्या शहरात एमडी ड्रग्सचे १९२ कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त करण्यात आला जर या कच्च्या मालापासून पूर्णपणे एमडी तयार झाले असते तर ते एमडी जवळपास ११०० कोटींच्या घरात राहले असते. वैभव अग्रवालच्या मालकीच्या प्लॉटवरील टिनाच्या शेडमध्ये एमडी निर्मितीचा हा गोरखधंदा सुरू होता. शहर परिसरातच मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचे उत्पादन सुरू असतानाही स्थानिक पोलिसांना याची साधी भनकही लागली नाही. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणातील तीन आरोपी नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून तपासादरम्यान मोठी गुप्तता पाळली जात आहे. अग्रवाल याला न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली तर अन्य दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
ठाणेदार महेश भोरटेकर मुख्यालयात
नागपूर पोलिसांनी केलेला भंडाफोड मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून हा मुद्दा विधिमंडळातही प्रखरपणे मांडण्यात आला. अधिवेशनादरम्यान आ. सुमित वानखेडे यांनी हे प्रकरण उपस्थित केले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी तात्काळ कारवाई करीत कारंजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार महेश भोरटेकर यांना मुख्यालयात अटॅच केले.