गडचिरोली,
ABVP Vidarbha convention अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) ५४वे विदर्भ प्रांत अधिवेशन यंदा दिनांक ९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले असून, या भव्य अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली. राष्ट्रीय मंत्री पायल किनाके यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशन कार्यालयाचे उद्घाटन आणि अधिवेशनाच्या लोगोचे विमोचन करण्यात आले. अभाविप ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असून, यंदा संस्थेने ७६ लाख ९८ हजार ४४८ सदस्यता नोंदवत पुन्हा एकदा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विद्यार्थी परिषद प्रांत अधिवेशनाचे आयोजन करत असून, विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, युवा आणि कार्यकर्ते गडचिरोलीत जमणार आहेत.
अधिवेशनामध्ये प्रांतातील विविध शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी समस्यांवर चर्चा होत असून, त्या सोडविण्यासाठी ठोस प्रस्ताव पारित केले जातात. तरुणाईचा उत्साह, नेतृत्वाला मिळणारे व्यासपीठ आणि प्रेरणादायी वातावरण हे विद्यार्थी परिषद अधिवेशनाचे वैशिष्ट्य मानले जाते. अधिवेशनादरम्यान भव्य शोभायात्रा, विषयानुसार भाषणं आणि पुढील वर्षासाठीचे नवीन प्रांताध्यक्ष, मंत्री व कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. गडचिरोली येथे प्रथमच विदर्भ प्रांत अधिवेशन होत असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्घाटन प्रसंगी पूर्व कार्यकर्ता बाबुराव कोहडे, प्रांत संघटन मंत्री विक्रमजीत कलाने, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, विभाग संघटन मंत्री राहुल शामकुवर आदी मान्यवर उपस्थित होते.