हिंगणघाट,
service-appointment : तालुक्यातील वडनेर येथील नि. मु. घटवाई विद्यालय येथील राणी झाडे यांना शिक्षणसेवक समाप्ती नंतरच्या सातत्य नियुतीस आठ महिन्यापासून मंजुरी मिळत नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे नाइलाजाने आत्मदहनाची परवानगी देण्याची मागणी येथील वयोवृद्ध प्रमोद अटेल यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, पालकमंत्री यांना केली आहे.

निवेदनात नमुद केल्यानुसार, विलास झाडे हे सहाय्य्क शिक्षक म्हणून नि. मु. घटवाई विद्यालय वडनेर येथे कार्यरत होते. ते कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात वडनेर ग्रापं अंतर्गत कोरोना बाधित क्षेत्रात उपाय योजनेसाठी कार्यरत असताना त्यांचा १ मे २०२१ मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर लोकशिक्षण मंडळ हिंगणघाट यांनी त्यांच्या पत्नीला २८ मार्च २०२२ ला नि. मु. विद्यालय, वडनेर येथे शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा तत्त्वावर सहायक शिक्षक या पदावर सामावून घेतले. त्यांच्या शिक्षक मान्यतेचा प्रस्ताव महिन्यात जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पाठविला. अडीच वर्षाने या पदला शिक्षण विभागाने मान्यता दिली. कार्यालयीन दप्तर दिरंगाईमुळे अजूनपर्यंत ती थकबाकी शिक्षिकेला मिळाली नाही. शिक्षिकेचा तीन वर्षाचा कालावधी ११ एप्रिल २०२५ ला समाप्त झाला. संस्थेने सेवा सातत्य नियुक्ती दिली आहे.
या सेवा सातत्य नियुक्तीला मान्यता प्रदान करण्याचा प्रस्ताव शाळेने २६ मे २०२५ रोजी शिक्षणाधिकार्यांना सादर केला. परंतु, आठ महिन्याचा कालावधी होऊनही शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी नियुक्तीस मान्यता न दिल्यामुळे शिक्षिकेला वेतन मिळत नाही. त्यामुळे आपल्या दोन मुलांना वृद्ध वडिलांवर अवलंबून राहावे लागतं आहे. पतीच्या मृत्यूस पाच वर्षाचा कालावधी होऊनसुद्धा सदर शिक्षिकेला कोणतेही आर्थिक लाभ मिळत नाही. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सध्या ही शिक्षिका व तिची दोन मुले हे महिलेचे सेवानिवृत्त वडील यांच्या आश्रयाने राहत आहेत. त्यांना सुद्धा एकत्र कुटुंबाचा खर्च भागविणे कठीण होत आहे. सततच्या उपासमारीने व आर्थिक दैन्यावस्थेमुळे शिक्षिकेच्या वडिलांनी २० डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयात ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन स्वतः आत्मदहन करू असा इशारा निवेदनातून दिला आहे.