नागपूर,
Information about Minister Avitkar विधानसभेच्या शुक्रवारच्या कामकाजाची सुरुवात मंगळवारच्या प्रलंबित अर्धातास चर्चेपासून झाली. यावेळी भाजपाच्या उमा खापरे यांनी राज्यातील परिचारिकांच्या वेतन, बदली आणि सुरक्षा यांसारख्या अनेक प्रलंबित समस्या मांडत परिचर्या संचालनालयाच्या स्थापनेची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की १३ ऑगस्ट २०२४ रोजी या संदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
या चर्चेला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आविटकर यांनी ९ ऑक्टोबर २०१७ रोजीच केंद्र सरकारकडून संबंधित पत्र प्राप्त झाल्याचे सांगितले. राज्यात सुमारे १२ हजार नर्सिंग कॅडर पदे असून महाराष्ट्राती आरोग्य सेवा सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि नगरविकास या तीन विभागांत विभागलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तिन्ही विभागांच्या अखत्यारीतील स्वतंत्र नर्सिंग कॅडरमधील महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी परिचर्या संचालनालयाची स्थापना जनतेपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीरीत्या पोहोचवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे मत मांडले. त्यावर आविटकर यांनी स्वतंत्र संचालक नेमण्याची प्रक्रिया सुरू असून अधिवेशनानंतर तिन्ही विभागांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यास सोपे जाईल, असे स्पष्ट केले. चर्चेचा समारोप करताना सभापती प्रा. राम शिंदे यांनी तीनही विभाग आणि प्रशासनाची संयुक्त बैठक सभापतींच्या दालनात घेण्याचे आश्वासन दिले.