लाईव्ह कॅमेरे खराब, तरीही अचूक डार्ट...बिबट्या अखेर जेरबंद

    दिनांक :12-Dec-2025
Total Views |
पुणे,
Leopard finally captured पुणे विमानतळ परिसराला गेल्या सात महिन्यांपासून अक्षरशः धास्तावून ठेवणारा प्रौढ नर बिबट्या अखेर वन विभागाच्या ताब्यात आला आहे. एप्रिलपासून अधूनमधून दिसत असलेल्या या बिबट्यामुळे विमानतळ परिसरात सुरक्षा यंत्रणांना उच्च सतर्कतेवर काम करावे लागत होते. भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि मानवी हालचाल कमी असलेल्या भागांचा वापर करून तो हुलकावण्या देत होता. कॅमेरा ट्रॅप, लाइव्ह कॅमेरे आणि पिंजऱ्यांच्या मदतीने दीर्घकाळ निरीक्षणानंतर अखेर वन विभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि पुणे विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
 
 
Leopard finally captured
११ डिसेंबर रोजी सुमारे ३० सदस्यांच्या पथकाने बिबट्याला अंदाजे ८० फूट लांबीच्या बोगद्यात नेण्याची नीट आखलेली योजना राबवली. नियंत्रित जागेत ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतल्याने धोका मोठा होता. याठिकाणी आधी बसवलेले दोन लाइव्ह कॅमेरे बिबट्याने खराब केल्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली होती. तरीही वन्यजीव वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौरव मंगला यांनी अवघड कोनातून अचूक डार्ट मारत बिबट्याला सुरक्षितपणे बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला बोगद्यातून बाहेर काढून वैद्यकीय निरीक्षणासाठी हलवण्यात आले. पथकाने कोणताही गोंधळ न करता शांतपणे आणि नियोजनाप्रमाणे काम केल्यामुळे ही कठीण मोहीम यशस्वी झाली.