माहूरगड पर्यटन विकास आराखड्यास अंतिम मान्यता मिळावी

आ. भीमराव केराम यांचा सरकार दरबारी पाठपुरावा

    दिनांक :12-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
किनवट, 
bhimrao-keram : किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी श्रीक्षेत्र माहूरगड पर्यटनस्थळाच्या समग्र विकासासाठी करण्यात आलेल्या 829.13 कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्यास अंतिम मान्यता मिळावी म्हणून राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची विशेष भेट घेऊन आवश्यक निवेदन सादर केले.
 

y12Dec-Keram 
 
नागपूर येथील महाराष्ट्र सुदूर संवेदन अनुप्रयोग केंद्रात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत उच्चाधिकार समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत माहूरगड पर्यटनविकास आराखड्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याने, आराखड्यास तत्काळ मंजुरी मिळण्यासाठी आमदार केराम यांनी शासनदरबारी प्रखर पाठपुरावा सुरू केला आहे.
 
 
आमदार केराम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनात, श्रीक्षेत्र माहूरगड हे प्रमुख शक्तिपीठ, श्रीरेणुकामातेचे स्थळ, तसेच दत्तसंप्रदायाचे जन्मस्थान असून वर्षभर लाखो भाविक येथे भेट देतात. परंतु विद्यमान सुविधा वाढत्या गर्दीपुढे अपुèया पडतात. जिल्हाधिकारी नांदेड यांनी सादर केलेला 829.13 कोटी रुपयांचा भव्य पर्यटन विकास आराखडा शासनाने 6 मे 2025 रोजी तत्वतः मान्य केलेला आहे.
 
 
आता अंतिम मंजुरी उच्चाधिकार समितीकडून देणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने, मुख्य सचिवांना आवश्यक सूचना देऊन आराखड्यास अंतिम मान्यता मिळण्यास सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली. शासकीय पत्रव्यवहारास गती, मुख्य सचिवांची भेट घेतली. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनादरम्यान आमदार केराम यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन, पर्यटक सुविधा, धार्मिक स्थळांचे संवर्धन, वाहतूक मार्ग, मूलभूत सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्थापन, रस्ते, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक वारसा संवर्धन या सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.
 
 
त्यांनी मुख्य सचिवांना योजना किती जनहिताची व क्षेत्राच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे हे स्पष्टपणे पटवून दिले व मंजुरीसाठी निवेदन दिले.
829.13 कोटींचा विस्तृत आराखडा
 
 
टप्पा 1 : 396.22 कोटी, टप्पा 2 : 432.91 कोटी या आराखड्यात पुढील महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास प्रस्तावित आहे. श्री रेणुकामाता मंदिर परिसर, दत्तशिखर, अनुसयामाता स्थळ, वनदेव मंदिर, मातृतीर्थ कुंड, सोनापीर परिसर, शेख फरीदबाबा दर्गा परिसर या सर्व ठिकाणांना समर्पक रस्ते, पार्किंग, पायाभूत सुविधा, धर्मशाळा, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा व पर्यटन सुविधा उभारल्या जाणार आहेत.