नवी दिल्ली
The mystery of Zubin Garg's death एसआयटीने प्रसिद्ध आसामी गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणात ३,५०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून, सहा बॉक्समध्ये महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. या आरोपपत्रात ईशान्य भारत महोत्सवाचे मुख्य आयोजक श्यामकानू महंत यांच्यासह इतर तिघांवर हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच झुबिन गर्ग यांचे चुलत भाऊ आणि निलंबित पोलीस अधिकारी संदीपन गर्ग यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
नऊ सदस्यांची एसआयटी टीम सहा वाहनांतून न्यायालयात दाखल झाली होती. झुबिन गर्ग यांचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये संशयास्पद परिस्थितीत बुडून मृत्यू झाला होता. ते ईशान्य भारत महोत्सवात सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले होते. या प्रकरणातील तपासादरम्यान सात जणांना आधीच अटक करण्यात आली आहे. सिंगापूर पोलिसांचाही स्वतंत्र तपास सुरु असून, त्यांना अद्याप गुन्हेगारी कटाचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. मात्र तपास किमान तीन महिने चालेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
आसाम सरकारने विशेष पोलिस महासंचालक एम. पी. गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली होती. गुप्ता यांनी सांगितले की आतापर्यंत ३०० हून अधिक साक्षीदारांची चौकशी झाली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी विधानसभेत सांगितले होते की झुबिन गर्ग यांचा मृत्यू स्पष्टपणे हत्या असल्याचे पुरावे त्यांच्या हाती आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य आयोजक श्यामकानू महंता, झुबिन गर्ग यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, बँड सदस्य शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृत प्रभा महंता, चुलत भाऊ डीएसपी संदीपन गर्ग आणि त्यांचे दोन पीएसओ नंदेश्वर बोरा आणि प्रबिन वैश्य यांचा समावेश आहे.