समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करा

- एका महिन्यात ‘गूगल लोकेशन’ उपलब्ध करा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शासनाला निर्देश

    दिनांक :12-Dec-2025
Total Views |
नागपूर, 
neelam-gorhe : विधान परिषदेत समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत आ. मिलिंद नार्वेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेदरम्यान स्वच्छतागृहांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा गंभीररीत्या समोर आला. या सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी महामार्गावर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. चर्चेदरम्यान उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महामार्गावरील कार्यरत स्वच्छतागृहे व स्नॅक्स सेंटर गूगलवर नसल्याने प्रवाशांना अडचण होते, त्यामुळे त्यांच्या लोकेशन्स एका महिन्यात गूगलवर उपलब्ध करण्याचे शासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले.
 
 
GORHE
 
लक्षवेधी दरम्यान आ. चित्रा वाघ यांनी सिन्नरजवळील ‘हिरकणी कक्ष’सह अनेक स्वच्छतागृहांची अस्वच्छ आणि वापरण्यायोग्य नसलेली स्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणली. काही स्वच्छतागृहांचा गोडाऊनसारखा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. या परिस्थितीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, डायबिटीक रुग्ण आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. मिलिंद नार्वेकर यांनी वाचून दाखवलेल्या सूचना क्र. ४१२ मध्ये वाढत्या अपघातांची आकडेवारी, सुविधांचा अभाव आणि पर्यटन हंगामातील वाढती गर्दी यांसारखे मुद्दे उपस्थित केले. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील नियोजित २९ सुविधांपैकी २२ ठिकाणी स्वच्छतागृहे, स्नॅक्स सेंटर आणि इंधन स्थानके सुरू आहेत. तसेच २१ ठिकाणी ४२० एफआरपी स्वच्छतागृहे उपलब्ध असून त्यांची देखभाल कंत्राटदारांकडे आहे. उर्वरित सुविधांचे काम गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले. तथापि प्रत्यक्ष परिस्थिती समाधानकारक नसल्याचे लक्षात घेऊन स्वच्छता, सुरक्षा आणि आवश्यक सुविधा त्वरित उपलब्ध करण्याचे आदेश उपसभापतींनी दिले.