राज्य पुरस्कार विजेत्या तरुण अभिनेत्याची आत्महत्या

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Akhil Vishwanath commits suicide सिनेसृष्टीतून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. राज्य पुरस्काराने सन्मानित तरुण अभिनेता अखिल विश्वनाथ (वय ३०) याचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह राहत्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
 
 Akhil Vishwanath commits suicide
मिळालेल्या माहितीनुसार, अखिलची आई सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत होती. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तिला अखिलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे समोर आले असून, अखिलने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
 
अखिल विश्वनाथ याने दिग्दर्शक सनल कुमार शशिधरन यांच्या ‘चोला’ या चित्रपटातून विशेष ओळख मिळवली होती. या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय त्याने ‘ऑपरेशन जावा’ या चित्रपटातही काम केले होते. बालकलाकार म्हणून त्याने ‘मांगंडी’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि त्यासाठी त्याला बाल कलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. पुढे २०१९ साली त्याला राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.