भाजपाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी

-महापालिका निवडणुकीची तयारी जोरात

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
bjps-candidature : भाजपाने अमरावती महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक असलेल्याच्या मुलाखती भाजपाने आजपासून सुरू केल्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी १ ते ९ प्रभागतल्या जवळपास १५० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहे.
 

amt 
 
भाजपाने १० ते १२ डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्जाचे वितरण करण्यात आले होते. ६४२ इच्छुकांनी आपले अर्ज पक्षाकडे सादर केले होते. या अर्जाची प्रभागनिहाय विभागनी करून शनिवार १३ डिसेंबरला सकाळी ११ वाजतापासून प्रत्यक्ष मुलाखती सुरू झाल्या. तत्पूर्वी दिप प्रज्ज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. यावेळी खा. अनिल बोंडे व अन्य पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते. पहिल्या दिवशी १ ते ९ प्रभागातल्या मुलाखती घेण्याता आल्या. या मुलाखती जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, भाजपाचे मनपा निवडणुक प्रमुख जयंत डेहनकर, माजी खासदार नवनीत राणा, माजी मंत्री प्रवीण पोटे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, प्रा. दिनेश सूर्यवंशी, किरणताई महल्ले, तुषार भारतीय, सुनील काळे यांनी घेतल्या. सांयकाळी ६ वाजेपर्यंत या मुलाखती सुरू होत्या. पहिल्या ९ प्रभागातल्या जवळपास १५० इच्छुकांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना आवश्यक ते सर्व प्रश्न विचारण्यात आले.
 
 
१४ डिसेंबरला १० ते १८ प्रभागापर्यंतच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. १५ डिसेंबरला १९ ते २२ प्रभागपर्यंतच्या मुलाखती होतील. दोन्ही दिवशी सकाळी ११ वाजता मुलाखतींना प्रारंभ होईल. मुलाखतीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे मांडला जाणार आहे. त्यानंतर विचारविनीमय होऊन उमेदवारींची घोषणा होईल. इच्छुकांची गर्दी लक्षात घेता अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता जास्त आहे. भाजपा कोणाकोणाचे समाधान करते, याकडेचे सर्वांचे लक्ष लागले आहे.