भंडारा,
bogus disability certificate, बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवून विविध सुविधांचा लाभ घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अशा बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा पहिला बळी भंडारा जिल्हा ठरला असून साकोली तालुक्यातील एका ग्राम महसूल अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी भंडारा यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. सुरेंद्र दुलीचंद बाळबुधे असे बडतर्फ अधिकाऱ्याचे नाव आहे.
दिव्यांग कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीस लागलेल्या अधिकारी आणि कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्याची आदेश काढले. आयुक्तांच्या या पत्रामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दिव्यांग प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी मिळविणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागाच्या प्रमुखांकडून जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र पाठवून अहवाल मागविला होता.
दरम्यान अजूनही bogus disability certificate, विविध विभागांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविलेल्या दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी बाकी आहे. मात्र काही जण यात दोषी आढळल्याचे समजते. साकोली तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी सुरेंद्र दुलीचंद बाळबुधे हे खुल्या प्रवर्गातून कर्णबधिर असल्याच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे 2 एप्रिल 2005 पासून सेवेत रुजू झाले. त्यांच्या प्रमाणपत्रावर 50 टक्के अपंगत्व नमूद होते. जिल्हा शल्य चिकित्सकांनी 2 मार्च 2005 रोजी दिलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे ही नियुक्ती निवड समितीने केली होती.दरम्यान प्रमाणपत्राची फेर तपासणी करण्यात आली. 13 जुन 2025 रोजी फेरतपासणीत हे दहा टक्के असल्याचे उघड झाले. बाळबुधे यांना या आधारे 1 ऑगस्ट 2025 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. उपचार केल्याने 50 टक्के असलेला बहिरेपणा 10 टक्यावर आल्याचा खुलासा बालबुधे यांनी दिला. मात्र 40 टक्के पेक्षा कमी अपंगत्व असल्याने सेवेतून काढून टाकण्याची शिफारस केली. त्यामुळे जिल्हाधिकारी भंडारा यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी बाळबुदे यांना सेवेतून कार्यमुक्त करीत असल्याचे आदेश काढले आहेत. बाळबूधे यांच्या निमित्ताने बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा पहिला बळी गेला असून आणखी बरेच जण या रांगेत येण्याची शक्यता आहे.