फ्नॉम पेन्ह,
Cambodia–Thailand conflict अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण जगातील मोठी सात युद्धे थांबवली असल्याचा दावा ट्रम्प सातत्याने करत होते. याच दाव्याच्या जोरावर नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, अशी त्यांची उघड अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या या दाव्याला कंबोडिया–थायलंड संघर्षाने थेट आव्हान दिले असून, ट्रम्प यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबोडिया आणि थायलंड यांच्यात युद्धविराम झाल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच कंबोडियाने थायलंडवर गंभीर आरोप केले आहेत. युद्धविरामावर सहमती झाल्यानंतरही थायलंडने आपल्यावर हवाई हल्ले सुरूच ठेवल्याचा दावा कंबोडियाने केला आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी जाहीर केलेला शांतता करार प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे समोर येत आहे. कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अधिकृत निवेदन जारी करत हा आरोप केला आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, १३ डिसेंबर २०२५ रोजी थाई हवाई दलाने दोन एफ-१६ लढाऊ विमानांच्या मदतीने कंबोडियाच्या हद्दीत सात बॉम्ब टाकले. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर असा हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर एकच खळबळ उडाली आहे. या आरोपांवर अद्याप थायलंडकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ब्लूमबर्ग वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या सीमेवरील हिंसाचारात थायलंडचे दहा सैनिक ठार झाल्याचा दावा थाई अधिकाऱ्यांनी केला होता, तर अनेक सैनिक गंभीर जखमी झाले होते. दुसरीकडे, कंबोडियानेही थायलंडच्या हल्ल्यांत एका लहान मुलासह दहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी युद्धबंदी झाल्याचा दावा करत शांतता प्रस्थापित झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, कंबोडियाच्या नव्या आरोपांमुळे ट्रम्प यांच्या दाव्यांवर पाणी फिरले असून, कंबोडिया आणि थायलंडच्या सीमेवर अजूनही तणाव कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. युद्ध थांबवल्याचे श्रेय घेण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना हा मोठा झटका मानला जात असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात त्यांच्या भूमिकेवर तीव्र टीका होण्याची शक्यता आहे.