नागपूर,
devendra-fadnavis : देशाच्या रक्षणासाठी शौर्य दाखविलेल्या परमवीर चक्र विजेत्या शूरवीरांना समर्पित बजेरियातील मनपाच्या वंदे मातरम् उद्यानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना व राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विकास विभाग, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भांडेवाडीतल्या मासळी बाजाराचे ई-भूमिपूजनही झाले.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, आ. कृष्णा खोपडे, आ. प्रवीण दटके, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन., मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी., मुख्य अभियंता मनोज तालेवार, माजी आमदार विकास कुंभारे, अनिल सोले, गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, अर्चना डेहनकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘विकास आणि विरासत’ या दोन्ही गोष्टींची सांगड या कार्यक्रमात बघायला मिळत आहे. वंदेमातरम् उद्यान हा आमचा वारसा आहे तर लवकरच निर्माण होणारे मासळी मार्केट हे आमच्या विकासाचे प्रतीक आहे. वंदे मातरम् उद्यान नागपूरला मिळालेली एक सुंदर भेट आहे.
वंदेमातरमला 150 वर्षे पूर्ण होत असताना, शहरात एक सुंदर उद्यानाचे लोकार्पण होत आहे. हे उद्यान अनेकांसाठी प्रेरणा उद्यान होईल. येथेे प्रोजेक्शन मॅपिंग करण्यासाठी राज्य सरकार मदत करेल. भांडेवाडीत अत्याधुनिक मासळी मार्केट पूर्ण झाल्यावर त्याचा विक्रेते व खरेदीदार या दोघांनाही फायदा होईल, असेही ते म्हणाले.
नितेश राणे
मुख्यमंत्र्यांचे आभार मानत नितेश राणे म्हणालेे, एक दर्जेदार मासळी मार्केट उभे राहिले पाहिजे, या दृष्टीने आम्ही पाऊल टाकले. यासाठी आ. प्रवीण दटके यांचा सातत्याने पाठपुरावा होता व या भूमिपूजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हा प्रकल्प केंद्र सरकार, राज्य सरकार व महानगरपालिका मिळून पूर्ण करणार आहेत.
या 19 हजार 910 चौरस मीटर जागेतील उद्यानाचे मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी पाहणी केली. त्यांनी माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या या संकल्पनेचे कौतुक केले. उद्यानाचे वास्तुविशारद प्रियदर्शन नागपूरकर यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्या संयोजनाखालील कार्यक्रमात माजी लष्करी अधिकाèयांसह नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.