तभा वृत्तसेवा
मारेगाव,
marriage reconciliation, ते दोघे पती पत्नी. चांगल्या संसारात वैचारिक मतभेद निर्माण झाले. प्रकरण कोर्टात गेले. लोक अदालतमध्ये न्यायाधीशांनी मानवीय दृष्टीने दोघांची समजूत काढली अन् अनेक वर्षापासून दुरावलेले दोन जीवांचे पुनर्मिलन झाले. आकाश व धनश्री यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले. दोन वर्षांची चिमुकली मुलगी असताना संसारात वैचारिक मतभेद निर्माण झाले. प्रकरण वाढले थेट कोर्टात गेले. दोन्ही पक्षांनी अटीतटीने केस भांडायला सुरवात केली.
हे प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आले. कामकाजाची धावपळ सुरू असताना या प्रकरणामध्ये मानवीय दृष्टीने काम पाहण्यात आले. निरागस बालिकेला घेऊन आलेल्या धनश्री आणि आकाश यांचे हे प्रकरण मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश केपी दवणे यांनी अत्यंत्य कौशल्याने हाताळले.
पती पत्नी यांचे भांडण होणे हे सर्वश्रुत आहे, परंतु संसाराचे दोन जीव पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात. लहान मुलांसाठीही दोघांनी एकमेकांस समजून काही त्याग करावा लागतो हे त्यांनी दोघांना सांगितले. दोघांना हे मनोमन पटले. अन् कोर्टातून प्रकरण निकाली निघाले. पतीपत्नी अत्यंत समाधानाने चिमुकल्या मुलीला घेऊन पुन्हा सुखी संसारची नवी सुरुवात करण्यास तयार झाले.
यात धनश्रीतर्फे ज्येष्ठ अधिवक्ता परवेज पठाण यांनी यशस्वी मध्यस्थी केली. यावेळी न्यायालयात अॅड. भास्कर ढवस, अॅड. प्रयाग रामटेके, न्यायालयीन कर्मचारी रा. रा. हरदिया, अक्षय गोहोकार, ज्ञानेश्वर वखरे, नितीन जाधवसह अनेक जण उपस्थित होते.